मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून 5362 सदनिका आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये नवी मुंबईतील काही घरांचा समावेश आहे. नवी मुंबईतील दिघा, सानपाडा, नेरुळ, घणसोली आणि गोठेघर येथे विविध योजनांची मिळून 293 घरं आहेत. नवी मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. नवी मुंबईतील 293 घरांच्या दर आणि क्षेत्रफळ यासंदर्भातील माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. नवी मुंबईतील या घरांच्या किंमती 14 लाखांपासून सुरु होतात.

नवी मुंबईतील 293 घरं ही 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आणि कोकण मंडळ, म्हाडा गृहनिर्माण योजना विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये विक्रीसाठी या योजनेतील आहेत.

नवी मुंबईतील बीकेएस गॅलेक्सी रिएलेटर्स एलएलपी दिघा, नवी मुंबई या प्रकल्पातील घरं अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाचं शुल्क असं एकूण 5590 रुपये भरावे लागणार आहेत. या प्रकल्पात एकूण 112 घरं आहेत तर घरांची किंमत 18 लाख 59 हजार 600 रुपये इतकी आहे. 29.10 चौरस मीटर इतकं क्षेत्रफळ या घरांचं आहे.

पिरॅमिड डेव्हलपर्स नेरुळ, नवी मुंबई येथे अल्प उत्पन्न गटातील 18 घरं आहेत. या घरांची किंमत 23 लाख ते 30 लाखांदरम्यान आहे. या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ 42.44 ते 54.594 चौरस मीटर इतकं आहे. यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण 10590 रुपये भरावे लागणार आहेत.

डीपीव्हीजी व्हेंचर्स एलएलपी सानपाडा, नवी मुंबई येथे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील 19 घरं आहेत. या प्रकल्पातील अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत 14 लाखांपासून सुरु होते. या उत्पन्न गटात 2 घरं आहेत, याचं क्षेत्रफळ 29.06 चौरस मीटर इतकं आहे. तर, अल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत 18 ते 24 लाखांदरम्यान आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 17 घरं असून या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ 37.172 ते 49.918 चौरस मीटर इतकं आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी अर्ज आणि अनामत असे 5590 रुपये आणि अल्प उत्पन्न गटासाठी 10590 रुपये भरावे लागतील.

निलकंठ इन्फ्राटेक घणसोली, नवी मुंबई येथे अल्प उत्पन्न गटातील 18 घरं आहेत. या घरांची किंमत 16 लाख ते 25 लाखांदरम्यान आहे. या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ 32.522 ते 48.194 चौरस मीटर इतकं आहे. यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण 10590 रुपये भरावे लागणार आहेत.

कामधेनु ग्रँड्युअर सानपाडा, , नवी मुंबई येथे अल्प उत्पन्न गटातील 17 घरं आहेत. या घरांची किंमत 23 लाख ते 28 लाखांदरम्यान आहे. या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ 42.320 ते 49.92 चौरस मीटर इतकं आहे. यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण 10590 रुपये भरावे लागणार आहेत.

निलकंठ इन्फ्राटेक मौजे घणसोली, नवी मुंबई येथे अल्प उत्पन्न गटातील 21 घरं आहेत. या घरांची किंमत 23 लाख ते 28 लाखांदरम्यान आहे. या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ 36.323 ते 46.228 चौरस मीटर इतकं आहे. यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण 10590 रुपये भरावे लागणार आहेत.

गोठेघर, नवी मुंबई येथे अल्प उत्पन्न गटातील 88 घरं आहेत. या घरांची किंमत 36 ते 37 लाखां दरम्यान आहे. या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ 47.85 चौरस मीटर इतकं आहे. यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण 10590 रुपये भरावे लागणार आहेत.