मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांची सोडत 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी म्हाडानं मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ सपंण्यास आता एका दिवस शिल्लक राहिला आहे. मात्र, म्हाडातर्फे अर्ज नोंदणी करणे आणि अनामत रक्कम जमा करणे यासाठी 19 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे. मुंबईकरांना म्हाडाच्या या लॉटरीत सहभागी व्हायचं असल्यास उद्या सकाळी 11.59 वाजण्यापूर्वी अर्जांची नोंदणी करणं आवश्यक आहे. दुपारी 12 वाजल्यानंतर अर्ज दाखल करता येणार नाहीत.
म्हाडानं सुरुवातीला 9 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर अशी मुदत अर्ज दाखल करण्यासाठी दिली होती. मात्र, त्यानंतर म्हाडानं मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय फायदेशीर ठरल्याचं वाढलेल्या अर्जांच्या संख्येवरुन पाहायला मिळत आहे. वाढवलेल्या मुदतीनुसार 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11.59 पूर्वी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर अनामत रक्कम जमा करण्यासाठी पुढील 12 तासांचा वेळ असेल.
उद्या अर्ज दाखल करण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर म्हाडाकडून 27 सप्टेंबरपर्यंत कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर 27 तारखेला सायंकाळी 6 वाजता अर्जदारांच्या नावांची यादी जाहीर केली जाईल. ज्यांना यादीवर आक्षेप असतील त्यांना ते 29 सप्टेंबर दुपारी वाजेपर्यंत ते नोंदवावे लागणार आहेत. त्यानंतर म्हाडा अंतिम यादी 3 ऑक्टोबरला जाहीर करेल. तर, 8 ऑक्टोबरला सोडत काढली जाईल त्याद्वारे कुणा कुणाला घरं मिळालं हे जाहीर केलं जाईल.
मुदतवाढ फायदेशीर ठरली
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुरुवातील घरांसाठी अर्ज करण्यासाठी 4 सप्टेंबर ही मुदत ठेवण्यात आली होती. म्हाडानं जाहीर केलेल्या काळात कागदपत्रांची जुळवाजुळव करणं शक्य नसल्यानं अनेक जण करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती. तर, दुसरीकडे म्हाडानं देखील बिल्डरांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या दोन्ही गोष्टींमुळं म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. बिल्डरांकडून मिळालेल्या घरांच्या किमतीत साधारणपणे 12 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
म्हाडाची घरं कोणत्या भागात?
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाकडे या घरांसाठी अनामत रकमेसह जवळपास 66 हजार अर्जदारांनी अर्ज केले आहेत. तर, अर्जांच्या नोंदणीची संख्या 89 हजारांवर गेली होती.
इतर बातम्या :