मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या (Mhada) मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 19 सप्टेंबरला संपली आहे. म्हाडानं दिलेली मुदतवाढ संपली तेव्हा अनामत रकमेसह 113568 अर्जदारांनी अर्ज दाखल केले होते. तर, एकूण 134344 अर्जांची नोंदणी करण्यात आली होती. आता घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून म्हाडाकडून पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पुढील चार तारखा महत्त्वाच्या असणार आहेत.
कोणत्या तारखा महत्त्वाच्या?
म्हाडाकडे अर्ज सादर करण्याची मुदत 19 सप्टेंबरला संपली होती. घरांसाठी अर्ज करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ दिल्यानं म्हाडाला फायदा झाला. आता म्हाडाकडून घरांसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाईल. ही यादी जाहीर करण्याची तारीख 27 सप्टेंबर अशी आहे. तर, या यादी काही त्रुटी असल्यास त्यावर आक्षेप नोंदवण्याची मुदत 29 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यानंतर म्हाडाकडून अंतिम यादी 3 ऑक्टोबरला जाहीर केली जाईल. म्हाडा प्रशासनानं लॉटरी काढण्यासाठी 8 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केलेली आहे.
म्हाडाच्या सोडतीचा कार्यक्रम कुठे होणार?
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीचा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यादिवशी ज्या अर्जदारांना घरं मिळाली आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर, दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 9 ऑक्टोबरपासून ज्या अर्जदारांना घर मिळालं नाही त्यांनी भरलेली अनामत रक्कम पुन्हा देण्यास सुरुवात होणार आहे.
म्हाडाची घरं कोणत्या भागात?
मुंबई मंडळानं बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पातील काही घरं, विकासकांकडून मिळालेली काही घरं आणि म्हाडाच्या मागील लॉटरीतील शिल्लक असलेली विखुरलेली घरं अशा एकूण 2030 घरांसाठी लॉटरी काढली होती. ही घरं म्हाडानं मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इत्यादी ठिकाणच्या गृहनिर्माण प्रकल्पामधील होती. यामध्ये बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पातील 1327, विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या आणि विखुरलेल्या ठिकाणांवरील 333 घरांचा समावेश होता.
दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळानं मुदतवाढ देण्याचा आणि विकासकांनी दिलेल्या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय गेमचेंजर ठरला. मुंबईतील घरांसाठी अर्ज करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. तर, विकासकांनी दिलेल्या 370 घरांची किंमत 12 लाख ते 75 लाख रुपयांनी कमी करण्यात आली होती.
इतर बातम्या :