Meesho Announces 11 Day Break for Employees : आजकाल कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कधी बोनस तर कधी इंसेंटीव्ह देऊन खूश करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म (E-Commerce Platform) मीशोने (Meesho) यापुढे एक पाऊल टाकलं आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ऐन दिवाळीत 11 दिवसांची विशेष सुट्टी (11 Day Break) देण्याचे जाहीर केलं आहे. मीशो कंपनीच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे. फेस्टिव्ह सीजन सेल संपल्यानंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना 11 दिवसांची सुट्टी देण्यात येणार आहे.


11 दिवसांचा 'रिसेट अँड रिचार्ज ब्रेक'


ऑनलाइन शॉपिंग साईट मीशोने कर्मचाऱ्यांना 11 दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या सुट्टीला 'रिसेट अँड रिचार्ज ब्रेक' (Reset and Recharge Break) असं म्हटलं आहे. या काळात कर्मचाऱ्यांना आपल्या मर्जीने सुट्टीचा वेळ घालवत आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष देऊ शकतात, असं कंपनीनं म्हटलं आहे.  फेस्टिव्ह सीजन सेलनंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना 11 दिवसांची सुट्टी देण्यात येणार आहे. ही सुट्टी 22 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर या कालावधीत म्हणजेच ऐन दिवाळीत देण्यात येणार आहे. कंपनीने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे सुट्टी दिली होती. यावर्षीही मानसिक आरोग्य राखत कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी सुट्टी देण्यात येणार आहे.


मीशो कंपनीचे सीईओ यांची भूमिका


मीशो कंपनीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देत म्हटलं आहे की, 'सणासुदीच्या काळात वार्षिक सुट्टी, आम्ही अशा गोष्टी करतो.' हा 11 दिवसांचा ब्रेक हा कर्मचाऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांची काळजी घेतो', असं कंपनीने म्हटले आहे.






 


मीशो भारतीय ई-कॉमर्स साईट


मीशो ही बंगळुरु स्थित भारतीय कंपनी आहे. 2015 साली विदित आत्रे आणि संजीव बरनवाल यांनी या ई-कॉमर्स वेबसाईटची सुरुवात केली. या ई-कॉमर्स वेबसाईटवर लहान-मोठे व्यावसायिक त्यांची उत्पादनं ऑनलाइन विकू शकतात. अल्पावधीत मीशो शॉपिंग साईटला चांगला प्रतिसाद मिळला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या