Share Market Crash : सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात खराब झाली आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवसाच्या व्यवहाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. दोन्ही निर्देशांक लाल चिन्हावर उघडले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेन्सेक्स 315 अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा तर, निफ्टीत 324 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी 15700 च्या पातळीवर उघडला. सध्या सेन्सेक्स 375 अंकांनी घसरुन 52,471 अंकांवर आहे, तर निफ्टी 110 अंकांनी घसरुन 15,664 च्या स्तरावर व्यवहार करत आहे.


विशेष म्हणजे, सोमवारी (13 जून) बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 1457 अंकांच्या घसरणीसह 52,847 वर बंद झाला होता, तर एनएसईचा निफ्टी निर्देशांक 427 अंकांच्या घसरणीसह 15,774 वर बंद झाला होता.


अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया आज स्थिर आहे. तरीही डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 78 रुपयांच्या पार गेलं आहे. डाॅलरच्या तुलनेत रुपया 78.03 वर आहे. तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 122 डाॅलर प्रति बॅरल आहे.


महागाई दरात किंचित घट जरी असली तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेंज बाहेर असल्याने भारतीय शेअर बाजारावर दबाव दिसत आहे. सोबतच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून कर्जावरील व्याजदरात 0.75 टक्क्यांची वाढ करण्याचे संकेत असल्याचे परिणाम बाजारावर जाणवत आहे. 

 

एलआयसीचा समभाग 30 मे नंतर पहिल्यांदाच ग्रीन झोनमध्ये आला आहे. एलआयसीचा शेअर अडीच टक्क्यांनी वधारुन 683 रुपये प्रति शेअरवर बाजार करत आहे. मात्र टेक महिंद्रा, इंडियन बॅंक, एचडीएफसी, रेमण्ड, गोदरेज प्राॅपर्टीज, एचडीएफसी बॅंकसारख्या समभागात मोठी घसरण झाली आहे.

 

याशिवाय क्रिप्टोकरन्सीवरही मोठा दबाव दिसत आहे. एका बिटकाॅइनची किंमत मोठ्या प्रमाणात घटली असून ती 18 लाख 34 हजारांवर आली आहे.

 

मंदीची शंका 
गुंतवणूकदारांच्या नजरा आता यूएस फेडरल रिझर्व्हच्या पुढील धोरणाच्या घोषणेवर आहे, जी उद्या म्हणजेच 15 जून रोजी होणार आहे. अमेरिकेतील व्याजदरांमधील वाढ अर्थव्यवस्थेला मंदीकडे ढकलत असल्याची शंका बाजारात आहे. त्यामुळे शेअर मार्केट सातत्याने निचांकी स्तरावर व्यवहार करत आहे.