LPG Gas Price Hike : महागाईचा सामना करत असलेल्या जनेतवरील दरवाढीचा बोझा आणखी वाढणार आहे. आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 104 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात नसून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. मागील महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 268.50 रुपये वाढ करण्यात आली होती.
इंडियन ऑइल कंपनीच्या दरानुसार, दिल्लीत 19 किलोच्या LPG सिलेंडरसाठी 2355.50 रुपये मोजावे लागतील. 30 एप्रिलपर्यंत केवळ 2253 रुपये इतकी एका सिलेंडरची रक्कम होती. कोलकात्यात 2351 ऐवजी 2455 रुपये, मुंबईत 2205 ऐवजी 2307 रुपये खर्च करावे लागणार आहेत. चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने बाहेर खाणे आणखी महाग होण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा परिणाम हॉटेल, खाद्य पदार्थाचे स्टॉल, कॅटरिंगच्या दरावर होण्याची शक्यता आहे.
घरगुती ग्राहकांना दिलासा
गॅस कंपन्यांनी घरगुती ग्राहकांना या महिन्यात दिलासा आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. मुंबईत विना अनुदानीत गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये आहे. तर, दिल्लीत विना अनुदानीत 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 949.50 रुपये झाले आहेत. तर कोलकात्यात गॅस सिलिंडरचे दर 976 रुपये आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा सर्वाधिक दर बिहारच्या पाटणामध्ये आहे. पाटणामध्ये 1039.50 रुपये इतका दर आहे.
सीएनजी गॅसच्या दरात वाढ
पेट्रोल, डिझेल दरवाढीने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे आता पुन्हा एकदा सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने प्रति किलो मागे 4 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅसच्या प्रति किलोसाठी 76 रुपये मोजावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेड हा मुंबई, ठाणे आणि परिसरात प्रमुख गॅस वितरक आहे. ही दरवाढ शनिवारपासून लागू झाली आहे.