अनेक महिलांसाठी - विशेषतः गृहिणींसाठी घरखर्चाचा ताळमेळ बसवणे, खर्चाच्या बाबतीत सुयोग्य निर्णय घेणे आणि भविष्यासाठी नियोजन करणे हे दैनंदिन कामाचा भाग असतो. या जबाबदाऱ्या महिलांमध्ये आर्थिक व्यवस्थापन, संवादकौशल्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांसारख्या कौशल्यांचा विकास करतात. विशेष म्हणजे, हीच कौशल्यं एक यशस्वी जीवन विमा सल्लागार/सल्लागारिणी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांशी अगदी सुसंगत आहेत.

हा व्यवसाय स्वीकारल्याने महिलांना स्वतःच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करता येते, तसेच इतरांनाही त्यांच्या जीवनातील ध्येयांसाठी योग्य नियोजन करण्यात मदत करता येते. अशा प्रकारे त्या स्वतःच्या कुटुंबावर आणि समाजावर सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम करू शकतात.विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 पर्यंत भारतातील एकूण जीवन विमा प्रतिनिधींपैकी सुमारे 29% महिला होत्या म्हणजेच 24.43 लाख एजंटांपैकी सुमारे 7 लाख महिला एजंट्स होत्या. हा आकडा सकारात्मक असला तरी, या क्षेत्रात अजूनही अपार संधी उपलब्ध आहेत. या प्रवाहाला गती देण्यासाठी, महिलांना अधिक संधी आणि आधारव्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, जेणेकरून अधिक महिला या क्षेत्रात पुढे येऊन यशस्वी होऊ शकतील.

जीवन विमा क्षेत्रातील करिअर‌द्वारे आर्थिक स्वावलंबन साधणे

महिलांचा जीवन विमा क्षेत्रातील सहभाग वाढवणे हे केवळ करिअरच्या संधीपुरते मर्यादित नाही तर ते आर्थिक सबलीकरण आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याचा प्रभावी मार्ग आहे. जीवन विमा सल्लागार म्हणून केलेले काम हे लवचिकता आणि आर्थिक स्थैर्य यांचा उत्तम समतोल प्रदान करते, जे महिलांना वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळत व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम बनवते. या क्षेत्रात महिलांना नियमित उत्पन्नाची शक्यता असते आणि त्याचबरोबर लोकांच्या जीवनावर अर्थपूर्ण परिणाम घडवण्याची संधी मिळते. त्यामुळे त्या केवळ स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत नाहीत, तर आपल्या कुटुंबाच्याही आर्थिक स्थैर्यास हातभार लावतात.

वैयक्तिक प्रगतीपलीकडे जाऊन, या क्षेत्रातील महिला आर्थिक सुरक्षिततेसाठी दक्षततेसाठी इतर इतर कुटुंबांना कुटुंबाना मार्गदर्शन करून आणि आपल्या समाजातील इतर महिलांनाही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रेरणा देऊन बदलाच्या वाहक ठरतात. जेव्हा अधिक महिलांना विमा क्षेत्रातील संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, तेव्हा एक सकारात्मक लाट निर्माण होते ज्यामध्ये त्या स्वतः सह आपल्या समाजातील इतर महिलांनाही आर्थिक निर्णय स्वतः घेण्यासाठी आणि विमा सल्लागार म्हणून यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतात. अशा प्रकारे त्या स्वतःची आणि इतरांची जीवन ध्येयं पूर्ण करण्यात मोलाची भूमिका बजावतात.

गृहिणी कशा पद्धतीने जीवन विमा सल्लागार म्हणून यशस्वी कारकीर्द करू शकतात?

गृहिणींनी जीवन विमा क्षेत्रात सल्लागार म्हणून यशस्वी वाटचाल सुरू करण्यासाठी काही मूलभूत टप्पे पाळले, तर त्यांच्यासाठी हे क्षेत्र फायदेशीर ठरू शकतेः

1. प्राथमिक पात्रता आणि प्रशिक्षणः 

बहुतेक विमा कंपन्या प्रशिक्षणाचे संरचित कार्यक्रम देतात, ज्यामध्ये विमा उत्पादनांची माहिती, विक्री तंत्र आणि आर्थिक नियोजनाच्या मूलभूत बाबी शिकवल्या जातात. या प्रशिक्षणामुळे महिलांना ग्राहकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येतात.

2. नेटवर्किंग आणि संबंधनिर्मितीः

भक्कम मानवी संबंध कौशल्य हे विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. महिलांना सहज संवाद साधण्याची नैसर्गिक ताकद असते, ज्याचा वापर करून त्या आपल्या नियोक्त्यांच्या मदतीने व्यावसायिक संबंध दृढ करू शकतात.

3. डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापरः

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी साधनं ठरली आहेत. महिलांनी या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून आपली विश्वासार्हता, कौशल्यं आणि ज्ञान दाखवावे, तसेच संभाव्य ग्राहकांना विमाब‌द्दल माहिती द्यावी.

4. सातत्यपूर्ण शिक्षण आणि कौशल्यवृद्धीः

उ‌द्योगातील नविन ट्रेण्डस्, उत्पादनं आणि नियमांमधील बदल यांची माहिती ठेवणं हे दीर्घकालीन यशासाठी आवश्यक असतं. संबंधित प्रमाणपत्रे मिळवल्यास विश्वासार्हता वाढते आणि करिअरमध्ये पुढील संधीही उपलब्ध होतात.

जीवन विमा क्षेत्र महिलांसाठी विशेषतः गृहिणींसाठी एक उत्तम संधी निर्माण करते, जिथे त्या आपल्या नैसर्गिक कौशल्यांचा वापर करून एक समाधानकारक आणि यशस्वी कारकीर्द घडवू शकतात. योग्य प्रशिक्षण, दृढ इच्छाशक्ती आणि मजबूत नेटवर्किंगच्या मदतीने महिला आर्थिक सल्लागार म्हणून स्वतःचे भविष्य घडवू शकतात, तसेच इतरांच्या जीवन ध्येयांनाही सुरक्षित दिशा देऊ शकतात.

आर्थिक सल्लागार होणे यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन, काम आणि वैयक्तिक जीवनात समतोल, आणि इतरांना सक्षम करण्याचे समाधान मिळते. महिलांमध्ये समाजात बदल घडवण्याची प्रचंड क्षमता आहे केवळ आपल्या घरापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण समुदायाच्या आर्थिक स्थैर्याला दिशा देण्याचीही ताकद त्यांच्यात आहे. अशा प्रकारे त्या कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्य घडवण्यात मोलाची भूमिका बजावू शकतात.

- समीर जोशी, चीफ एजन्सी ऑफिसर, बजाज आलियान्झ लाइफ इन्शुरन्स