LIC Share Price : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर दरात सुरू असलेली घसरण सातत्याने सुरू आहे. एलआयसीच्या आयपीओला पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि किरकोळ गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसादा दिला होता. मात्र, शेअर बाजारात एलआयसीच्या शेअरला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून एलआयसी शेअर दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आतापर्यंत गुंतवणुकदारांचे 1.51 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 


LIC शेअर दरात घसरण


एलआयसीच्या शेअर दरात घसरण सुरू आहे. शुक्रवारी एलआयसीच्या शेअर दराने 708.05 रुपयांचा नीचांकी दर गाठला. बाजार बंद होताना शेअरचा दर 709.40 रुपयांवर पोहचला होता. या घसरणीनंतर एलआयसीचे बाजार भांडवली मूल्य 4.48 लाख कोटी रुपये झाले आहे. एलआयसी कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून बाजार भांडवलात आतापर्यंत 1.51 लाख कोटींची घट झाली आहे. 


चिंता करायला नको


एलआयसीच्या शेअर दरात होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी, DIPAM चे सचिव तुहिनकांत पांडे यांनी सांगितले की, एलआयसीच्या शेअर दरात होत असलेली घसरण अस्थायी आहे. सरकारदेखील चिंतेत आहे. लोकांना एलआयसीचे फंडामेंटल्स समजण्यास वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. एलआयसीचे व्यवस्थापन सर्व पैलूंवर लक्ष देणार असून शेअर धारकांना फायदा होईल असेही त्यांनी म्हटले. मार्च अखेरीस एलआयसीची असलेली एम्बेडेड वॅल्यू शेअर प्राइसची खरी किंमत दर्शवले. कंपनी आपली एम्बेडेड वॅल्यू जून महिन्याच्या अखेरपर्यंत अपडेट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


लाभाशांचा फुसका बार


दरम्यान, एलआयसी शेअर बाजारात लिस्ट होताना 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जवळपास 9 टक्क्यांच्या डिस्काउंट दरात शेअर लिस्ट झाला. त्यानंतर शेअर दरात घसरण सुरू आहे. गुंतवणुकदारांना फायदा व्हावा यासाठी एलआयसी संचालक मंडळाकडून लाभांश मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, मागील महिन्या झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने प्रति शेअर 1.5 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली.