Kisan Credit Card Rule Change : किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदलाची शक्यता, शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Kisan Credit Card Rule Change : किसान क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये बदल करण्यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं चार सूचना केल्या आहेत.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं त्यांच्या डेव्हलपमेंटल आणि नियामक धोरणात किसान क्रेडिट कार्ड संदर्भात नव्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचा उद्देश शेती आणि त्याच्याशी संबंधित घडामोडींसदर्भातील नियमांना एकत्र करणे, त्याची व्याप्ती वाढवणे, प्रक्रिया सोपी करणे, नव्या आवश्यकतांचा समावेश करणे हे आहे. या ड्राफ्ट नियमांवर जनतेकडून आणि संबंधित संस्थांकडून 6 मार्च 2026 पर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत.
किसान क्रेडिट कार्डमध्ये कोणते बदल?
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सर्वप्रथम कर्ज मंजुरी आणि कर्ज परतफेडीसंदर्भातील नियम एकसमान करणे. यासाठी पिकांच्या हंगामाला महिन्यांच्या आधारावर निश्चित करण्यात आलं आहे. पिकांना आता दोन गटात विभागण्यात आलं आहे. छोट्या कालावधीचं पीक 12 महिन्यांचं मानलं जाईल तर दीर्घ कालावधीचं पीक 18 महिन्यांचं मानलं जाईल.
किसान क्रेडिट कार्डचा कालावधी वाढवून 6 वर्ष करण्यात आला आहे. पहिल्यांदा दीर्घ काळातील पिकांसाठी कर्जाची कालमर्यादा पूर्णपणे जुळत नव्हती. आता पिकांचा कालावधी आणि कर्जाचा कालावधी यांच्यात ताळमेळ राहील.
किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा प्रत्येक पिकाच्या हंगामातील निश्चित खर्चाच्या अनुसार असेल. म्हणजेच शेतकऱ्याला शेतीच्या खऱ्या लागवड खर्चाच्या आधारे कर्ज मिळेल. यापूर्वी ते अंदाजावर मिळायचे.
शेतकरी आता मातीची चाचीणी, रिअल टाईम हवामानाचा अंदाज, ऑर्गेनिक शेती यासारख्या चंगल्या कृषी पद्धतींच्या प्रमाणीकरणासाठी देखील किसान क्रेडिट कार्डमधून पैसे घेऊ शकतात. या खर्चांना फार्म असेटची दुरुस्ती यासाठी निश्चित करण्यात आलेल्या 20 टक्के अतिरिक्त विभागात निश्चित करण्यात आलं आहे.
आरबीआयनं सूचवलेले नवे नियम व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि ग्रामीण सहकारी बँकांना लागू असतील. म्हणजेच किसान क्रेडिट क्रार्डशी संबंधित सर्व बँका या नियमात येतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे 6 मार्च 2026 पर्यंत सूचना, शिफारशी पाठवता येऊ शकतात. आरबीआयच्या Connect 2 Regulate या विभागामार्फत किंवा ईमेल मार्फत सूचना पाठवता येऊ शकतात.
आरबीआयनं प्रस्तावित केलेले किसान क्रेडिट कार्ड संदर्भातील बदलांमुळं शेतकऱ्यांना कर्ज घेणे आणि कर्ज परतफेड करणे अधिक सोपं होईल. आता पिकांच्या कालावधीनुसार कर्जाचा कालावधी निश्चित होईल. किसान क्रेडिट कार्डची सुविधा 6 वर्ष असेल.
शेतकरी मातीची चाचणी, हवामानाचा अंदाज, शेतीच्या विविध पद्धती यावर किसान क्रेडिट कार्डमधून पैसे खर्च सुरु करु शकतात.
























