ITR Filing: सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं करदात्यांना आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. दरवर्षी आयटीआर फाइल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असते. या वर्षी मुदत वाढवून 15 सप्टेंबर करण्यात आली आहे. यामुळं करदात्यांना दिलासा मिळाला आहे.ज्यांच्या खात्यांच्या लेखापरिक्षणाची गरज नसते अशा वेतन मिळणाऱ्या कर्मचारी, पेन्शनर्स याशिवाय इतर लोकांना जुन्याच वेळेनुसार कर द्यावा लागेल. आयटीआर फाईल करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काही कागदपत्रं सोबत ठेवणं आवश्यक आहे. ज्यांचं पगारापासून मिळणारं उत्पन्न 50 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना आयटीआर फॉर्म- 1 भरावा लागेल.
फॉर्म 16
आयटीआर फाईल करताना ज्या कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये महत्त्वाचं कागदपत्रं म्हणजे फॉर्म 16 आहे. फॉर्म 16 तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्यांच्याकडून दिला जातो. त्यामध्ये तुमचा एकूण पगार, टीडीएस किती कापला गेला आहे याची पूर्ण माहिती असते. या फॉर्मच्या मदतीनं तुम्ही टॅक्स पोर्टलवर भरलेली माहिती योग्य आहे की नाही याची पडताळणी करु शकता.
फॉर्म 16A, 16B, 16C, आणि 16D
फॉर्म 16 A विमा कमिशन, मुदत ठेवीवरुन मिळणाऱ्या व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर लागू होतो. जर एखादा व्यक्ती 50 लाख रुपयांपेक्षा अधिक स्थावर संपत्तीची खरेदी करतो त्यावेळी खरेदी करणाऱ्याला विक्रेत्याचा टीडीएस कपात करावा लागतो. हे फॉर्म QB मध्ये नोंदवावं लागतं. यानंतर फॉर्म 16 B तयार होतो. याशिवाय जर महिन्याचं भाडं 50 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर भाडेकरु घरमालकाला फॉर्म 16 C देतो. भाडेकरुन टीडीएस कपात करणे आणि प्रमाणपत्र देण्यासाठी जबाबदार असतो. या प्रमाणपत्रातून वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्त्रोतातून झालेल्या कमाईचा मार्ग कळतो आणि टॅक्स रिटर्न कोणत्याही चुकीशिवाय भरण्यात मदत होते.
AIS, TIS आणि फॉर्म 26AS
हे तुमच्या कर रेकॉर्डच्या प्रमाणं असतं. फॉर्म 26AS मध्ये टीडीएस आणि टीसीएसची माहिती असते. AIS मध्ये बँकेकडून मिळालेलं व्याज, FD आणि शेअरच्या डिटेल्स असतात. जेव्हा TIS मध्ये AIS मध्ये दिलेल्या माहितीचा एक सारांश असतो. ही सर्व माहिती इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर उपलब्ध असते.
कॅपिटल गेन स्टेटमेंट
जर तुम्ही तुमच्याकडील स्टॉक, म्युच्युअल फंड किंवा संपत्ती विकली असेल तर तुम्हाला कॅपिटल गेन्स संदर्भातील माहिती द्यावी लागेल. हे तुम्हाला ब्रोकर किंवा फंड हाऊसकडून मिळू शकेल.
बँक स्टेटमेंट आणि इंटरेस्ट सर्टिफिकेट
बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजाचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. कारण व्याजाची नोंद आयटीआरमध्ये करणं आवश्यक असते. यामुळं तुम्ही एआयएस, फॉर्म 26 AS मधून सुटलेली माहिती नोंदवता येते.
विदेशातील कमाई किंवा अनलिस्टेड शेअर
जर तुमच्याकडे विदेशातील कंपन्यांचे शेअर्स असतील किंवा तिथं तुमचं बँक खातं असेल तर त्याची माहिती द्यावी लागेल. जरी तुमचं हे उत्पन्न टोटल इन्कम एक्झम्पशन लिमिट पेक्षा कमी असलं तरी नोंदवावं लागतं. भारतीय कंपन्यांचे अनलिस्टेड शेअर असतील तर त्याबाबत माहिती द्यावी लागते. कंपनीचं नाव किंवा शेअरची माहिती द्यावी लागते.