Gold Price Today मुंबई: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पाश्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर वाढले होते. अखेर इस्त्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. इराण आणि इस्त्रायल संघर्ष थांबल्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाला आहे. सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 91550 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 99870 रुपये इतका आहे. या प्रमाणं चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर घसरुन 100900 रुपयांवर आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गोल्ड फ्युचर्सचे दर 1 लाख रुपयांवर गेले होते. त्यामध्ये घसरण होऊन ते 98163 रुपयांवर पोहोचले आहेत. एमसीएक्सवर चांदीच्या वायद्यांचे दर 105962 रुपयांवर आहेत.
नवी दिल्लीतील सोन्याचा दर
राजधानी नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 92,440 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 100830 रुपये इतका आहे. या प्रमाणं अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 91600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 99920 इतका आहे. पाटणामध्ये अहमदाबादच्या दराप्रमाणेच सोन्याची विक्री होत आहे. हैदराबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 91550 रुपये इतका आहे तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 99970 रुपये इतका आहे.
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधी होताच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या बाजारासंदर्भातील जाणकारांच्या मते सोन्याच्या दरात येत्या काही दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळू शकते.
सोन्याचे दर कसे ठरतात?
सोने आणि चांदीच्या दर ठरवण्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार केला जातो. ज्यामध्ये एक्सचेंज रेट, डॉलरच्या किंमतीमध्ये तेजी आणि घसरण, जागतिक बाजारातील घडामोडी, सीमा शुल्क याचा परिणाम होतो. यामुळं सोन्याचे आणि चांदीचे दर दररोज निश्चित केले जातात.
भारतात सोने आर्थिक आणि सांस्कृतिक कारणांमुळं महत्त्वाचं मानलं जातं. लग्नसराई किंवा सणांच्या काळात सोने खरेदी करणं चांगलं मानलं जातं. याशिवाय गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून देखील सोन्यातील गुंतवणूक केली जाते. महागाई किती झाली असली तरी सोन्यातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो, असं मानलं जातंय.