Investment Plan : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचे विविध मार्ग समोर आले आहेत. पण ज्या ठिकाणी चांगला परतावा मिळतो, त्या ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. कारण कमी काळात चांगला परतावा मिळतो. दरम्यान, तुम्हाला जर कमी पगार असतानाही करोडपती व्हायचं असेल तर ते शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य नियोजन करावं लागेल.
बचत हा चांगल्या भविष्याचा पाया
कमी पगारामुळे बचत करणे आणि गुंतवणूक करणे शक्य होत नाही, असा अनेकदा लोकांचा समज असतो. पण बचत तुमच्या उत्पन्नावर अवलंबून नसून तुमच्या सवयींवर अवलंबून आहे. जर तुम्ही योग्य सवयी अवलंबली तर तुम्ही कमी पगारातही करोडपती होऊ शकता. बचत हा केवळ पैसा वाचवण्याचा मार्ग नाही तर तो चांगल्या भविष्याचा पाया आहे. अनेकांना असे वाटते की त्यांचे उत्पन्न कमी आहे, त्यामुळे ते बचत करू शकत नाहीत. पण जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा एक छोटासा भागही नियमितपणे वाचवला आणि तो योग्य ठिकाणी गुंतवला, तर दीर्घकाळात ते मोठ्या निधीत बदलू शकते.
एखाद्याने किती बचत करावी?
सामान्य नियमानुसार, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मासिक उत्पन्नाच्या किमान 20 टक्के बचत केली पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुमचा पगार 20,000 रुपये असेल तर तुम्ही किमान 4,000 रुपये वाचवले पाहिजेत. ही रक्कम छोटी वाटली तरी योग्य गुंतवणुकीने मोठा फंड तयार करु शकता.
कुठे करावी गुंतवणूक?
आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण म्युच्युअल फंडातील SIP हा एक उत्तम पर्याय आहे. SIP द्वारे गुंतवणूक केल्याने तुम्हाला वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो, जो पारंपारिक बचत योजनांपेक्षा जास्त आहे.
1 कोटी रुपयांचा निधी कसा निर्माण कराल?
तुम्ही दरमहा 4,000 रुपयांची SIP केली आणि ती 28 वर्षे चालू ठेवल्यास, तुमची एकूण ठेव 13,44,000 होईल. परंतू, यावर मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजामुळे तुम्हाला एकूण सुमारे 1.10 कोटी रुपये मिळू शकतात. जर तुम्ही हे 30 वर्षे चालू ठेवले तर ही रक्कम 1.41 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तुम्हाला कमी पगारातही करोडपती होणे अशक्य नाही. तुम्ही लवकर बचत करणे, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आणि संयम राखणे महत्त्वाचे आहे. छोट्या बचतीमुळे भविष्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे आजच तुमच्या बचत आणि गुंतवणुकीचे नियोजन करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा.
महत्वाच्या बातम्या: