Tax Saving Scheme : 2023 वर्ष सुरु झालं आहे. नवीन वर्षासोबतच 2022-2023 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ज्यांचा पगार टॅक्स स्लॅबमध्ये येतो, त्यांनी आपल्या कराचं नियोजन (कर बचत योजना) करावं. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कर नियोजन सुरु करण्याची अनेकांना सवय असते. परंतु असं करणं टाळा. किमान तीन ते चार महिने आधीच कर नियोजन (Tax Saving) सुरु करण्याचा प्रयत्न करा. अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूक करुन तुम्हाला आयकराच्या विविध कलमांतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. आम्‍ही तुम्‍हाला अशा पाच कर बचत योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्‍ये गुंतवणूक केल्‍याने तुम्‍हाला मोठ्या परताव्यासह कर बचतीचा लाभ मिळतो. जाणून घेऊया कर बचतीच्या योजनांबद्दल...


1. पीपीएफ (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना)


सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीत भरीव निधी जमा करु शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. ही टक्के जोखीम मुक्त योजना आहे ज्यामध्ये व्याज दर तिमाही आधारावर सरकारद्वारे हस्तांतरित केला जातो. सरकार या योजनेवर 7.10 टक्के व्याज देत आहे. या योजनेत तुम्ही 500 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. यामध्ये तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते.


2. एनपीएस (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली)


नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचे चांगले नियोजन करु शकता. यामध्ये तुम्ही रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्हींचा पर्याय निवडू शकता. यामध्ये सेवानिवृत्ती निधीचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 89C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. यासह, कलम 80CCD (E) अंतर्गत 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. अशाप्रकारे तुम्ही जास्तीत जास्त एकूण 2 लाख रुपयांची सूट मिळवू शकता.


3. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉजिट स्कीम (पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना) 


केंद्र सरकारने नुकतीच पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीममध्ये व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 6.70 टक्क्यांऐवजी 7 टक्के व्याज मिळणार आहे. हा दर जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी लागू करण्यात आला आहे. तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक करु शकता. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळेल.


4. वॉलंटरी प्रोविडेंट फंड (ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी)


असे अनेक लोक आहेत ज्यांची 1.5 लाख रुपयांची कर सूट मर्यादा पूर्णपणे वापरली जात नाही. अशा परिस्थितीत, पीएफ व्यतिरिक्त, तुम्ही ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक करुन आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळवू शकता. यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाही ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या बेसिक सॅलरीच्या 100 टक्के रक्कम ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवू शकता. याद्वारे तुम्हाला भक्कम सेवानिवृत्ती निधी मिळवण्यात मदत होईल. या योजनेअंतर्गत तुम्हाला 8.10 टक्के दराने परतावा मिळतो.


5. ELSS म्युच्युअल फंड (इक्विटी लिंक्ड बचत योजना)


ELSS म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतरही, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. जास्त कर बचत योजनेत तुम्हाला किमान पाच वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. पण या योजनेत तुम्ही तीन वर्षांची गुंतवणूक करुन 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर बचतीचा लाभ मिळवू शकता  . यामध्ये तुम्हाला 10 टक्क्यांहून अधिक रिटर्नही मिळू शकतो.