Infosys Q2 Results: अनेक कंपन्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. देसातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी आयटी कंपनी इन्फोसिसनेही गुरुवारी (17 ऑक्टोबर) आपला दुसरा तिमाही निकाल जाहीर केला. या निकालानुसार इन्फोसिस कंपनीने वित्त वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहित चांगली कामगिरी केली आहे. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने आपला महसूल 40986 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे. या कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 6506 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्यामुळे इन्फोसिस या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभांश जाहीर केला आहे.
दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी
इन्फोसिस या कंपनीने 21 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने लाभांश जाहीर केला आहे. म्हणजेच आगामी काळात इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा होणार आहे. इन्फोसिस या कंपनीने वित्त वर्ष 2024-25 मध्ये पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 4.7 टक्के अधिक फायदा झाला.
महसूल 5.1 टक्क्यांनी वाढला
गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर इन्फोसिस या कंपनीने आपल्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला होता. या निकालानुसार इन्फोसिसला दुसऱ्या तिमाहीत तब्बल 6506 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर याआधीच्या म्हणजेच 2023-24 या वित्त वर्षात या कंपनीला 6212 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत इन्फोसिसने यावेळी दुसऱ्या तिमाहीत 5 टक्क्यांनी अधिक नफा कमवला आहे. वित्त वर्ष 2024-25 मध्ये इन्फोसिसचा महसूल 40986 कोटी रुपये राहिला. गेल्या वित्त वर्षांत हा महसूल 38,994 कोटी रुपये होता. म्हणजेच गेल्या वित्त वर्षाच्या तुलनेत चालू वित्त वर्षात हा महसूल 5.1 टक्क्यांनी वाढला आहे.
गुंतवणूकदारांना मिळणार मोठा फायदा
दुसऱ्या तिमाहीत नफ्यात वाढ झाल्यामुळे इन्फोसिसने आपल्या गुंतवणूकदारांचाही फायदा करण्याचे ठरवले आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 21 रुपये प्रति शेअर या हिशोबाने अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 29 ऑक्टोबर 2024 ही रेकॉर्ड टेट असेल.
दरम्यान, इन्फोसिस कंपनीने दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. आगामी काळात ही कंपनी नेमकं काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तत्त्पूर्वी भारतीय शेअर बाजारत सध्या पडझड पाहायला मिळत आहे. असे असले तरी दुसऱ्यात तिमाहीचा निकाल आल्यामुळे या शेअरमध्ये 2.58 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. गुरुवारी हा शेअर 1969.50 रुपयांवर पोहोचला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाचा दिवाळीनिमित्त धमाका, विशेष ठेव योजना जाहीर, आकर्षक व्याज दराची घोषणा