Indigo Airlines : देशातील आघाडीची खासगी विमान कंपनी इंडिगोची विमान सेवा शनिवारी विस्कळीत झाली होती. इंडिगोचे बहुतांशी कर्मचारी अचानकपणे सुट्टीवर गेल्याने विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला होता. शनिवारी जवळपास 45 टक्के विमान सेवा वेळेवर सुरू होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेण्याचे कारण समोर आले आहे. इंडिगोच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांनी एअर इंडियातील नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी सुट्टी घेतली होती.  


इंडिगोचे बहुतांशी कर्मचाऱ्यांनी आजारपणाची सुट्टी घेतली. त्यामुळे 55 टक्के विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला. सिव्हिल एविएशन डेटानुसार, 2 जुलै रोजी 900 हून अधिक उड्डाणांना उशीर झाला होता. इंडिगोकडून विमानांचे 1600 उड्डाणे पार पाडली जातात. मात्र, एअर इंडियामध्ये सुरू असलेल्या नोकर भरतीकडे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा वळवला. एअर इंडियांच्या विविध केंद्रावर विविध पदांसाठी मुलाखती सुरू आहेत. या विविध पदांसाठीच मुलाखती देण्यासाठी इंडिगोचे कर्मचारी सुट्टीवर होते, अशी वृत्त 'बिझनेस टुडे'ने दिले आहे. 


'बिझनेस टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, DGCA ने विमानांच्या उड्डाणांना झालेल्या उशिराबाबत इंडिगोकडून स्पष्टीकरण मागवले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिक माहिती घेतली जात आहे.  शनिवारी एअरलाइन्सच्या ऑन-टाइम परफॉर्मेन्स (OTP) एअर एशिया 98.3 टक्के, गो फर्स्ट 88 टक्के, विस्तारामध्ये 86.3 टक्के. स्पाइसजेट 80.4 टक्के आणि एअर इंडिया 77.1 टक्के इतका राहिला. 


टाटा समूहाने एअर इंडिया खरेदी केल्यानंतर विमान सेवेत सुधारणा होत असल्याचे म्हटले जात आहे. एअर इंडियात नव्याने भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. टाटा समूहाकडे एअर इंडियाचा ताबा असल्याने अनेकांनी एअर इंडियातील नोकरभरतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारच्या ताब्यात असताना एअर इंडियाची सेवा खालावली असल्याचा दावा करण्यात येत होता. एअर इंडियावर कर्जाचे ओझेदेखील वाढत होते. त्यामुळे केंद्र सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला.