Indian Origin American Nikesh Arora: मुंबई : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती (American Businessman of Indian Origin) निकेश अरोरा (Nikesh Arora) सध्या चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे, त्यांचं नाव ब्लूमबर्ग (Bloomberg) अब्जाधीशांच्या निर्देशांकात समाविष्ट केलं आहे. एवढंच नाही तर, ते काही अब्जाधीशांपैकी एक आहेत, जे गैर-संस्थापक आहेत. म्हणजेच, अरोरा यांनी स्वत: कोणतीही कंपनी सुरू केलेली नाही, तरीही ते अब्जाधीश झाले आहेत. विचारात पडलात ना? पाहुयात निकेश अरोरा नेमकं करतात काय?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), निकेश अरोरा यांची एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. भारतीय चलनानुसार त्यांची मालमत्ता 12,495 कोटी रुपये आहे. निकेश अरोरा सध्या टेक कंपनी पाउलो अल्टो नेटवर्कचे सीईओ आणि अध्यक्ष आहेत. या कंपनीचे मार्केट कॅप 91 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. निकेश अरोरा दीर्घकाळापासून अमेरिकन कंपन्यांशी संबंधित आहेत. त्यांनी गुगलमध्येही काम केलं आहे. व्यापारी, गुंतवणूकदार आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1968 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे झाला. त्यांनी एअरफोर्स स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी आयआयटी बीएचयूमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमधून एमबीए आणि बोस्टन कॉलेजमधून फायनान्समध्ये एमएस पदवी मिळवली.
कधीकाळी केलंय बर्गरच्या दुकानात काम अन् आता अब्जाधीशांच्या यादीत होतोय समावेश
अरोरा यांनी 1992 मध्ये फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्समधून आपल्या करिअरची सुरुवात केली. येथे त्यांनी टेक्निकल मॅनेजमेंट आणि फायनान्स संदर्भात पदं भूषवली आहेत. 2000 मध्ये, त्यांची फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्समध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. अरोरा यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, जेव्हा ते अमेरिकेत आले तेव्हा, त्यांच्या वडिलांनी त्यांना 75 हजार रुपये दिले होते. आपला खर्च भागवण्यासाठी अनेक ठिकाणी काम केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी कधी बर्गरच्या दुकानात काम करायचे, तर कधी सिक्युरिटी गार्ड म्हणूनही काम केलं.
त्यावेळी गुगलला दिलेला Netflix विकत घेण्याचा सल्ला, पण...
पण अरोरा यांच्या मेहनतीनेच त्यांना या पदापर्यंत पोहोचवलं आहे. अरोरा जेव्हा गुगलमध्ये होते, तेव्हा ते कंपनीतील सर्वात जास्त पगार घेणारे कर्मचारी होते. अरोरा 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले आणि 2012 मध्ये, त्यांना Google कडून वार्षिक 5.1 अब्ज डॉलर्स पगार मिळाला. असं सांगितलं जातं की, जेव्हा निकेश अरोरा गुगलमध्ये होते, तेव्हा त्यांनी 2009 मध्ये नेटफ्लिक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी, Netflix चं मार्केट कॅप 3 डॉलर अब्ज होतं, जे आज 27 बिलियन डॉलरपेक्षा जास्त झालं आहे. मात्र, त्यावेळी गुगलला अरोरा यांनी सुचवलेला प्रस्ताव फारसा पटला नाही.
गुगलमधून एग्झिट घेतल्यानंतर ते सॉफ्ट बँकेच्या अध्यक्षपदी रूजू झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सॉफ्ट बँकेनं 250 दशलक्ष डॉलर्सचा करार केला होता. इतकंच नाहीतर, सॉफ्ट बँकेनं स्नॅपडील, ओला, ग्रोफर्स आणि हाउसिंग डॉट कॉम सारख्या भारतीय स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली होती.
अरोरा जून 2018 मध्ये पाउलो अल्टो नेटवर्कमध्ये सामील झाले. तेव्हापासून ते पाउलो अल्टो नेटवर्कमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. कंपनीत सामील झाल्यानंतर, त्यांना 125 दशलक्ष डॉलर किमतीचे शेअर्स देण्यात आले. पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये अनेक पटींनी वाढ झाली, त्यामुळे त्यांची एकूण संपत्तीही 1.5 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नव्या वर्षात अंबानी मोठा धमाका करण्याच्या तयारीत; आता 'या' क्षेत्रात दबदबा वाढवण्यासाठी सज्ज