Sugar Price Hike: देशातील काही भागात यंदा कमी पाऊस (Rain) झाला आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. यामुळ यंदा साखरेच्या उत्पादनात (Sugar production) घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं सध्या साखरेच्या दरात (Sugar Price) वाढ होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2023-24 या हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांत साखरेचे उत्पादन 7.7 टक्क्यांनी घटले असून, ते 113 लाख टनांवर आले आहे. ऊस उत्पादनात घट झाल्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखर उत्पादनात घट झाली आहे.


साखरेची सरासरी किंमत 44.62 रुपये प्रति किलो


सरकारी आकडेवारीनुसार, सध्या साखरेची सरासरी किंमत 44.62 रुपये प्रति किलो आहे. मागील वर्षीच्या तुलनेच साखरेच्या किंमतीत वाढ झाली आहे. मागील एका वर्षापूर्वी साखरेची किंमत 41.82 रुपये प्रति किलो होती. आकडेवारी जाहीर करताना, नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) ने सांगितले की, चालू हंगामात डिसेंबर 2023 पर्यंत 511 कारखान्यांनी 1223 लाख टन उसाचे गाळप केले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या देशातील दोन प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात घट झाली आहे. सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन मर्यादित केले आहे. 2023-24 हंगामात देशांतर्गत वापरासाठी 305 लाख टन नवीन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे, जे गेल्या वर्षी 2022-23 हंगामात 330.90 लाख टन होते.


महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत 38.40 लाख टन साखरेचे उत्पादन 


MFCSF च्या आकडेवारीनुसार, साखर उत्पादनाच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत 38.40 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर गेल्या वर्षी 2022-23 मध्ये 47.40 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.


कोणत्या राज्यात साखरेचं किती उत्पादन होणार? 


आकडेवारीनुसार, कर्नाटकात या हंगामात 24 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, तर गेल्या वर्षी 26.70 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये डिसेंबर 2023 पर्यंत 34.65 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे एका वर्षापूर्वी 30.80 लाख टन होते. थंडी वाढल्याने साखरेचे उत्पादन वाढेल, असे एमएफसीएसएफचे म्हणणे आहे. हंगामाच्या अखेरीस उत्तर प्रदेशात 115 लाख साखरेचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात 90 लाख टन आणि कर्नाटकात 42 लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकते. तामिळनाडूमध्ये 12 लाख टन आणि गुजरातमध्ये 10 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.


एमएफसीएसएफचे एमडी प्रकाश नायकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध शिथिल केले जातील. यापूर्वी साखरेचे उत्पादन 290 लाख टन असल्याचा अंदाज होता. त्यात आणखी 15 लाख टनांनी वाढ होऊ शकते. साखर कंपन्यांना दिलासा मिळावा यासाठी एमएफसीएसएफ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! केंद्र सरकारनं निर्णय बदलला, इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील; ऊस उत्पादकांसह कारखानदारांना मोठा दिलासा