लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार सहमती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. लंडन येथील चेकर्स येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली. यूकेच्या पंतप्रधानांचं ते ग्रामीण भागातील अधिकृत निवासस्थान आहे. 

 मुक्त व्यापार करारामुळं भारत आणि ब्रिटन यांच्यात आर्थिक विकासाच्या आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. प्रामुख्यानं या कराराचा भारतीय युवकांना फायदा होणार आहे. यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्या संधी वाढतील. 

सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या करारामुळं तंत्रज्ञान, तंत्रज्ञान सेवा, वित्तीय सेवा, व्यावसायिक सेवा, शिक्षणाशी संबंधित सेवांचा थेट लाभ होईल. 

या करारामुळं भारताच्या श्रमकेंद्री निर्यात क्षेत्र कापड, चामडे, शूज, फर्निचर, रत्न आणि दागिने, तथा खेळाशी संबंधित उत्पादनांना ब्रिटनच्या बाजारात करमुक्त पोहोचता येईल.  सध्या ब्रिटन दरवर्षी 23 अब्ज डॉलर्सची अशा प्रकारची उत्पादनं आयात करतं. ज्यामुळं भारतात उत्पादन आणि रोजगारात वाढ होईल.

भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार कराराचा फायदा कृषी, वस्त्रोद्योग, प्लास्टिक्स, मरिन प्रोडक्टस,रसायने आणि अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीचा भारताला फायदा होणार आहे.   सध्या भारतीय उत्पादनांवर ब्रिटनमध्ये सरासरी आयात शुल्क 15 टक्क्यांवर आहे ते  3 टक्क्यांवर मुक्त व्यापार करारानंतर येईल.  लंडनमधील एका डेटानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील मुक्त व्यापार करार झाल्यानंतर दोन्ही देशांमधील एका वर्षातील व्यापार  33 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढू शकतो. भारतासोबतचा मुक्त व्यापार करार हा मोठा विजय असल्याचं ब्रिटनकडून मानलं जात आहे.    

या मुक्त व्यापार करारामुळं भारतातून ब्रिटनला निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क ब्रिटनकडून 99 टक्के ते 100  टक्के कमी होईल.यामुळं भारतीय उत्पादनांना ब्रिटनचा बाजार खुला होईल. तर, भारताकडून देखील ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क 85 ते 90 टक्क्यांनी कमी होईल. 

ब्रिटनमध्ये उत्पादित केलेलं ब्रिटीश मद्य आणि व्हिस्की याच्यावरील टॅरिफ आता 150 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांवर येईल. या दशकाच्या शेवटपर्यंत ते शुल्क 40 टक्क्यांवर येणं अपेक्षित आहे. भारताकडून ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांवरील टॅरिफ 100 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी होतील. 

भारतानं ब्रिटनसोबत केलेल्या व्यापार करारामुळं विदेशी निर्यातदारांसाठी भारतीय बाजार खुला होईल.

मुक्त व्यापार कराराचे फायदे

मुक्त व्यापार करारामुळं भारतीय आयटी, टेक आणि फार्मा कंपन्यांना ब्रिटनमध्ये गुंतवणूक आणि व्यापाराच्या विस्ताराच्या नव्या संधी मिळणार आहेत.ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक आणि नवी सुरुवात आहे.  यूकेमधील हाय टेक मशीनरी आणि इतर वस्तूंवरील टॅरिफ घटल्यानं भारतातील उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. दोन्ही देशांनी स्टार्टअप, ग्रीन एनर्जी, फिनटेक सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी रोडमॅप केला आहे.