नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीची वाढ अपेक्षेपेक्षा अधिक गतीनं झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा वेग 8.2 टक्के इतका असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024-25 या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा वेग 5.6 टक्के इतका होता. तर, एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत जीडीपी चा दर 7.8 टक्के इतका होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर 7 टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता.
India Q2 GDP : दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.2 टक्क्यांवर
अर्थतज्ज्ञांच्या मते सणांच्यापूर्वी झालेली उलाढाल आण जीएसटीमधील सुधारणा याचा देखील जीडीपीच्या वाढीच्या दरावर झाला असावा. जीएसटीच्या स्लॅबमध्ये करण्यात आलेली कपात 22 सप्टेंबरपासून लागू झाली होती. म्हणजेच जीएसटीच्या दरकपातीचा पूर्णपणे परिणाम ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत दिसू शकतो. त्यापूर्वीच जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 8.2 टक्क्यांवर पोहोचला आहे.
घरगुती उत्पादनांची आणि किराणा मालाची मागणी दस्या तिमाहीत वाढली होती. 22 सप्टेंबरपासून जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करण्यात आले होते. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीमधील बदलांमुळं सर्वसामान्यांच्या हतात 2 लाख कोटी रुपये राहतील. त्यामुळं त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल, असं म्हटलं होतं.
कृषी आणि खनिकर्म उद्योगातील वाढ वार्षिक निकषातील 3.1 टक्के इतकी नोंदवण्यात आली. जी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 3.5 टक्के होती. तर, दुसऱ्या तिमाहीत या क्षेत्रातील वाढ 3.5 टक्के इतकी झाली आहे. या क्षेत्राची गेल्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील वाढ 4.1 टक्के इतकी होती.
उत्पादन आणि वीज उद्योगाची वार्षिक वाढ 8. 1 टक्के इतकी झाली आहे. तर, दुसऱ्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ 9.1 टक्के इतकी वार्षिक आधारावर झाली आहे.
वित्तीय, रिअल इस्टेट, प्रोफेशनल सर्व्हिसेस क्षेत्राची वाढ जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 10.2 टक्के इतकी झाली आहे. जी गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 7.2 टक्के इतकी होती.
दरम्यान, आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत जीडीपीचा दर 8 टक्के राहिला आहे. ही आकडेवारी जीएसटीचे बदल पूर्णपणे लागू होण्यापूर्वीचे आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जीएसटी संदर्भात करण्यात आलेल्या बदलांचा परिणाम पाहायला मिळेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. सुरुवातीला भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्यात आलं होतं. त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून करण्यात येणार होती. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं त्यात 25 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्याचा परिणाम दुसऱ्या तिमाहीत दिसून आला नाही. तिसऱ्या तिमाहीत ट्रम्प टॅरिफचा कसा परिणाम राहतो ते पाहावं लागेल.