Stock Market: भारत-पाकिस्तान युद्ध थांबताच शेअर मार्केटमध्ये आनंदाला भरती! सेन्सेक्सची 2200 अंकांनी उसळी, निफ्टीही सुस्साट
Stock Market : भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर भांडवली बाजारात सोमवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सची 2200 अंकांनी उसळी घेतलीय तर निफ्टीही सुस्साट असल्याचे चित्र आहे.

India Pakistan War Stock Market: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भडकलेले युद्ध शनिवारी थांबले होते. भारत आणि पाकिस्तान (India Pakistan War) यांच्यातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची हॉटलाईनवरुन चर्चा झाल्यानंतर शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारत-पाक युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर निर्माण झालेले मंदीचे ढग हवेतच विरले होते. याचे सकारात्मक पडसाद सोमवारी भांडवली बाजारात पाहायला मिळाले.
भांडवली बाजारात सोमवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. आज (12 मे) सकाळी बाजार उघडतात सेन्सेक्सने सुरुवातीला 1900 आणि नंतर लगेच तब्बल 2200 अंकांची उसळी घेतली. त्यामुळे आता सेन्सेक्सने 81 हजारांची पातळी ओलांडली आहे. तर निफ्टीही वधारताना दिसला. निफ्टी 50 निर्देशांकाने 700 अंकांची उसळी घेतली असून त्याने 24 हजार 600 चा टप्पा ओलांडला आहे.
युद्धाचा तणाव निवळताच शेअर मार्केटमध्ये आनंदाला भरती!
गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेच्या आयात कर धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण पाहायला मिळाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली होती. यामधून शेअर बाजार सावरत नाही तोच भारत आणि पाकिस्तान युद्धामुळे चिंतेचे ढग दाटले होते. या सगळ्यामुळे भारतीय गुंतवणूकदार काहीसे धास्तावले होते. मात्र, आता शस्त्रसंधी झाल्याने युद्धाचा तणाव निवळला आहे. त्यामुळे शेअर बाजाराची घोडदौड पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सुरु झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान युद्धामुळे सोन्याच्या दरातही चढउतार पाहायला मिळत आहेत. शस्त्रसंधी झाल्यामुळे सोन्याचे दर पुन्हा खाली येताना दिसत आहेत.
जागतिक बाजारपेठेतही तेजी
शुक्रवारी अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आले.एस अँड पी- 500 (S&P 500) 0.07 टक्क्यांनी घसरला. तर डाउ जोन्स 0.29 टक्क्यांनी घसरला. वॉलमार्ट, अलिबाबा आणि जेडी डॉट कॉमचे निकाल या आठवड्यात प्रसिद्ध होतील. याशिवाय, मंगळवारी अमेरिकेतील महागाईचा डेटा जाहीर केला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा शेअर बाजारावर अल्पकालीन परिणाम होणार असल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे. याचे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांचा सततचा विश्वास. यासोबतच, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सतत खरेदी केल्याने निर्देशांकाला मदत झाली आहे.
हे ही वाचा
























