नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावलं होतं. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादलं. म्हणजेच अमेरिकेनं भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफचा भारत रशियाकडून तेल खरेदीवर परिणाम झाला नसल्याचं पाहायला मिळतं. कारण, गेल्या काही महिन्यात भारतानं रशियाकडून विक्रमी तेल खरेदी केली आहे. नोव्हेंबरमध्ये भारताची रशियाकडून तेल खरेदी 4 टक्क्यांनी वाढून 2.6 अब्ज यूरो पर्यंत पोहोचली आहे.
चीननंतर भारत रशियन तेलाचा मोठा खरेदीदार
यूरोपियन रिसर्च सेंटर सीआरआयनं एका रिपोर्टमध्ये म्हटलं की रशियाकडून कच्च्या तेल खरेदीच्या बाबत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक नोव्हेंबर महिन्यात लागतो. भारतानं रशियाकडून ऑक्टोबर महिन्यात 2.5 अब्ज यूरोचं कच्चं तेल खरेदी केलं होतं. नोव्हेंबरमध्ये रशियाच्या एकूण तेल निर्यातीपैकी 47 टक्के निर्यात चीनला, 38 टक्के भारताला, 6 टक्के तुर्की आणि 6 टक्के यूरोपियन यूनियनला केलं आहे.
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरनं म्हटलं नोव्हेंबर महिन्यात भारताची रशियाकडून तेल आयात ऑक्टोबरच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढली आहे. ही गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक आयात आहे. डिसेंबरमध्ये तेल खरेदी वाढू शकते, असा अंदाज देखील या संस्थेनं वर्तवला आहे.
अमेरिकेनं 22 ऑक्टोबरला रशियातील मोठ्या तेल कंपन्या रोसनेफ्ट आणि ल्यूकऑईलवर निर्बंध लादले होते. यूक्रेन युद्धासाठी रशियाचं आर्थिक बळ मर्यादित करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचपीसीएल, एचपीसीएल मित्तल एनर्जी, मंगळुरु रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्सनं रशियाची तेल आयात थांबवली आहे. मात्र, इंडियन ऑईल सारख्या अजून निर्बंध नसलेल्या रशियन कंपन्यांकडून तेल खरेदी करत आहेत.
सरकारी कंपन्यांकडून सर्वाधिक तेल खरेदी: रिपोर्ट
सीआरआयएनं म्हटलं की नोव्हेंबरमध्ये खासगी तेल कंपन्यांची आयात कमी झाली असली तरी सरकारी तेल कंपन्यांनी रशियन कच्चा तेलाची खरेदी 22 टक्क्यांनी वाढवली आहे. भारत जगातील तिसरा क्रूड आईलचा आयातदार देश आहे. रशिया यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानं भारत रशियन क्रूड ऑईलचा मोठा खरेदीदार देश बनला आहे. रशियाकडून सवलतीच्या दरात तेल विक्री केली जातेय. भारत आता जवळपास 40 टक्के कच्चे तेल रशियाकडून खरेदी करतोय.
दरम्यान, भारताकडून कच्चा तेलाची आयात केल्यानंतर रिफाईन केल्यानंतर त्याची निर्यात देखील केली जाते. सीआरईएच्या दाव्यानुसार नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाला निर्यात 69 टक्क्यांनी वाढली. जी गुजरातच्या जामनगर येथील रिफायनरीतून करण्यात आली. कॅनडाला देखील आठ महिन्यानंतर रशियन तेलापासून बनवलेल्या इंधन मिळालं आहे.