समजा, उद्या अचानक तुमच्यासोबत काही अनपेक्षित घडलं तर... तुम्ही आयुष्यभर मेहनत करून कमावलेलं घर, जमीन, बँकेतील पैसे आणि इतर संपत्ती नेमकी कोणाला मिळणार? याचा निर्णय कोण घेणार? म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, मृत्यूपत्र म्हणजे काय? ते का तयार करावे? कसे तयार करावे? आणि त्यासाठी किती खर्च येतो?

Continues below advertisement

सर्वात आधी समजून घेऊया, मृत्यूपत्र म्हणजे काय?

मृत्युपत्र म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज. ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती कोणाला मिळावी आणि किती मिळावी, हे स्वतः ठरवू शकते. म्हणजेच, तुमच्या इच्छेनुसार तुमच्या संपत्तीचे वाटप होण्यासाठी मृत्यूपत्र उपयोगी पडते.

Continues below advertisement

 संपत्तीची यादी तयार करा

मृत्यूपत्र तयार करण्याआधी तुमच्याकडे असलेल्या सर्व संपत्तीची यादी तयार करा.उदाहरणार्थ,-घर आणि जमीन-बँकेतील पैसे आणि मुदत ठेवी-शेअर्स आणि म्युच्युअल फंड-सोने आणि दागिने-इतर मालमत्तातुमच्या मालकीची संपत्ती कोणती आहे, याची माहिती व्यवस्थित लिहून ठेवा.

संपत्ती कोणाला द्यायची ते ठरवा

आता तुमची कोणती संपत्ती कोणाला द्यायची आहे, हे स्पष्ट लिहा. उदाहरणार्थ, घर मुलाला द्यायचे आहे, बँकेतील पैसे मुलीला द्यायचे आहेत किंवा इतर संपत्ती पत्नीला द्यायची आहे. प्रत्येकाचा हिस्सा स्पष्ट लिहिल्यामुळे भविष्यातील वाद टाळण्यास मदत होऊ शकते. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त तुमच्या मालकीच्या हक्कातील संपत्तीबाबतच निर्णय घेऊ शकता.

कार्यपाल निवड करा

मृत्यूपत्र तयार करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यपाल निवड. कार्यपालक म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर मृत्युपत्रात लिहिलेल्या इच्छांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या विश्वासू व्यक्तीची निवड करा.

 मृत्यूपत्र लिहा आणि साक्षीदारांच्या सह्या घ्या

-आता तुमचे मृत्युपत्र तयार करा.-मृत्यूपत्र साध्या कागदावरही लिहिता येते.त्यामध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, संपत्तीची माहिती आणि कोणाला काय द्यायचे आहे, हे स्पष्ट लिहा. त्यानंतर मृत्यूपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीने त्यावर सही करावी. तसेच दोन साक्षीदारांच्या सह्याही आवश्यक आहेत.

नोंदणी करणे गरजेचे आहे का?

आता अनेकांना प्रश्न पडतो की मृत्यूपत्राची नोंदणी करणे गरजेचे आहे का? तर नाही! भारतात मृत्यूपत्राची नोंदणी करणे बंधनकारक नाही. पण तुम्हाला हवे असल्यास दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची नोंदणी करून घेऊ शकता.

किती खर्च येतो?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मृत्युपत्र तयार करण्यासाठी किती खर्च येतो? जर तुम्ही स्वतः साध्या कागदावर मृत्यूपत्र तयार केले, तर त्यासाठी सरकारी नोंदणी शुल्क लागत नाही. पण वकिलाकडून मृत्युपत्र तयार करून घेतल्यास त्यांचे वेगळे शुल्क लागू शकते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. मृत्यूपत्र तयार करणे म्हणजे मृत्यूचा विचार करणे नाही, तर आपल्या कुटुंबाच्या भविष्याची जबाबदारी घेणे आहे.