नवी दिल्ली : आजकाल प्रत्येकाला आपलं स्वत: चं घर असावं असं वाटतं. भारतात महानगरांमध्ये किंवा शहरांमध्ये स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. घर खरेदी करण्यासाठी बहुतांश जण गृहकर्जाचा पर्याय स्वीकारतात. कारण, घर खरेदीसाठी लागणारी मोठी रक्कम प्रत्येकाकडे असतेच असं नाही. त्यामुळं घर खरेदीचं स्वप्न पाहणारे किंवा गृह कर्ज घेणारे आरबीआयच्या पतधोरणाकडे लक्ष ठेवून असतात. कारण, आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास गृह कर्जाचा व्याज दर वाढतो. याशिवाय दुसरी स्थिती म्हणजे आरबीआयनं रेपो रेट कमी केल्यास गृह कर्जाचा व्याज दर कमी असतो. आरबीआयनं एप्रिल 2026 चं पतधोरण जाहीर करताना रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला आहे.
आरबीआयनं रेपो रेटमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळं गृहकर्जाच्या व्याजदरात फारसे बदल झालेले पाहायला मिळत नाहीत. करिअरच्या सुरुवातीलाच स्वत: चं घर खरेदी करण्याची मानसिकता वाढत आहे. तर, काही कुटुंब गुंतवणूक म्हणून घर खरेदी करत असतात. घरं खरेदी करण्यासाठी गृह कर्ज महत्त्वाचं ठरते.मात्र, गृह कर्ज घेताना सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो तो म्हणजे व्याज दर होय. आरबीआयच्या रेपो रेटचा आधार घेत विविध बँका गृह कर्जाचे व्याज दर निश्चित करतात. गृह कर्जाचा व्याज दर कर्ज कालावधी, क्रेडिट स्कोअर आणि आरबीआयचा रेपो रेट यावर अवलंबून असतो.
कोणती संस्था किती टक्के व्याज दरानं कर्ज देते?
भारतातील गृह कर्ज देणाऱ्या प्रमुख बँकांचे आणि हाऊसिंग फायनान्सचे व्याज दर आपण पाहणार आहोत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, फेडरल बँक आणि बजाज हाऊसिंग फायनान्स यांचे व्याज दर किती आहेत, हे पाहणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया 7.25 टक्के ते 8.70 टक्के या व्याज दरानं गृह कर्ज देते. एचडीएफसी बँक 7.20 टक्क्यांपासून गृह कर्ज देते. तर, आयसीआयसीआय बँक 7.45 टक्के व्याज दरानं गृह कर्ज देते. एक्सिस बँकेचा गृह कर्जाचा व्याज दर अधिक असून ते 8 टक्क्यांपासून 11.90 टक्के व्याज दरानं कर्ज देतात
बँक ऑफ इंडियाचा गृह कर्जाचा व्याज दर 7.10 टक्के ते 10 टक्क्यांदरम्यान आहे. कॅनरा बँक देखील 7.15 टक्के ते 10.00 टक्के व्याजानं गृह कर्ज देते. पंजाब नॅशनल बँकेकडून 7.20 टक्के ते 9.10 टक्के व्याजानं गृहकर्ज दिलं जातं. आयडीबीआय बँकेचा गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.35 टक्के इतका आहे., फेडरल बँक 7.30 ते 9.75 टक्के व्याजानं गृह कर्ज देते. बजाज हाऊसिंग फायनान्सचा गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.15 टक्के इतका आहे.
