नवी दिल्ली : भारतात टिअर 1 मधील शहरानंतर टिअर 2 आणि टिअर 3 शहरांमध्ये घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवमध्यमवर्गाकडून घरं खरेदी होत असल्यानं रिअल इस्टेट क्षेत्र जोरात आहे. अनेकजण घर खरेदी करत असताना गृहकर्ज घेत असतात. घर खरेदी करणं हा आयुष्यातील मोठा आर्थिक निर्णय असतो. घर खरेदी करणं जसा आर्थिक निर्णय असतो तसा तो भावनात्मक देखील असतो. आर्थिक तज्ज्ञांच्या मते घराचं स्वप्न तुम्हाला कर्जाच्या बोजात अडकवू नये यासाठी घर खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे रचनात्मक आर्थिक योजना असणं आवश्यक आहे.  

Continues below advertisement


2025 या वर्षामध्ये घरत खरेदीची भावना वाढली  कारण, वाढलेलं उत्पन्न, स्थिर व्याज दर , रिअल इस्टेट हा दीर्घकालीन असेट असल्याचा विश्वास वाढीस लागल्याचं फ्याडाचे संस्थापक कुंतल भन्साळी यांनी म्हटलं. नव्या रिपोर्टनुसार 62 टक्के घर खरेदी करणारे लोक 35 वर्षाच्या आतील आहेत.तर, 40 टक्के लोकांकडून 75 लाख रुपयांपर्यंतचं घर खरेदी केलं जात आहे. गृहकर्जाचा व्याज दर 8 ते 9 टक्क्यांमध्ये असल्यानं स्मार्ट खरेदीदारांकडून घर खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या फायनान्सची तयारी केली जात आहे. 


घर खरेदी करणाऱ्यांसाठी आर्थिक नियोजनातील महत्त्वाचे टप्पे 


तज्ज्ञांच्या मते बजेट आणि बचत योजनेपासून सुरुवात करा. तुम्ही खरेदी करत असलेल्या घराच्या किंमतीच्या 20 टक्के रक्कम डाऊनपेमेंटसाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. याशिवाय  6 ते 9 महिन्यांच्या ईएमआयची जितकी रक्कम असेल तितकी रक्कम तुमच्याकडे आपत्कालीन फंड म्हणून शिल्लक असावी. 


घर खरेदी करणाऱ्यांनी घराची किंमत, घर खरेदीसाठी लागणारं कर्ज आणि त्यावरील व्याज या गोष्टींची पडतळणी करुन घ्यावी. पती पत्नीच्या नावानं संयुक्तपणे गृहकर्ज काढल्यास सेक्शन 80 सी आणि 24 (बी) नुसार कर बचत होऊ शकते. 


तुम्ही तुमचं घर खरेदी करत असताना योग्य नियोजन, शिस्तबद्धपणे अंमलबजावणी आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास फायदा होऊ शकतो, असं इझीलोनचे प्रमोद कठुरिया म्हणाले. घर खरेदी करत असताना सर्व कर, स्टॅम्प ड्युटी, नोंदणी फी, इंटेरिअर, मेंटनन्स याचा देखील हिशोब केला पाहिजे. तुमच्या इतर आर्थिक ध्येयाला धक्का न लागता या गोष्टी पार पडतात का हे पाहायला हवं. 


डाऊनपेमेंटची रक्कम जितकी अधिक असेल त्या प्रमाणात तुमच्यावरील व्याजाचा ताण कमी होईल. यामुळं तुम्हाला इतर आर्थिक ध्येय गाठण्यासठी लवचिकता मिळेल. आपत्कालीन फंड, निवृत्ती आणि मुलांचं शिक्षण यासाठी तुम्ही वित्त नियोजन करु शकता, असं कठुरियांनी म्हटलं. 


क्रेडिट हेल्थ हा देखील महत्त्वाचा घटक आहे. क्रेडिट स्कोअर आणि कर्ज आणि उत्पन्न गुणोत्तर चांगलं राखल्यास गृहकर्ज घेताना कर्ज देणाऱ्यांसोबत चांगल्या प्रकारे वाटाघाटी करता येऊ शकतात. 


गृहकर्ज घेत असताना फक्त दर्शनी व्याजदराकडे लक्ष देऊ नका पूर्ण कालावधीसाठी किती खर्च येणार, प्रीपेमेंट सुलभता, संभाव्य व्याजदर बदल आणि वैयक्तिक उत्पन्न वाढ याचा विचार करा. 


तज्ज्ञांच्या मते घर खरेदी करत असताना त्यासोबत मेंटनन्स, मालमत्ता कर, उपकरणं, दुरुस्ती यासाठी देखील खर्च करावा लागतो. यामुळं तुमच्या मासिक बजेटवर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच घर खरेदी करताना भावनात्मक दृष्ट्या तयार असण्यासोबतच आर्थिक दृष्ट्या देखील तयार असणं आवश्यक आहे.  योग्य नियोजनानं घर खरेदीचा निर्णय घेतल्यास तो तुमच्या आर्थिक वाटचालीतील महत्त्वाचा निर्णय ठरेल.