LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
LPG Cylinder Price: सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात घसरण झाली आहे. मे महिन्यात देखील दरात कपात झाली होती.

LPG Cylinder Price नवी दिल्ली: जून महिन्यात देशातील छोटी मोठी रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबाचालकांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 24 रुपयांनी कमी केले आहेत. आता दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक वापराचा सिलेंडर 1723.50 रुपयांना मिळेल. हे दर 1 जूनपासून लागू होणार आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात घसरण झाली आहे. मे महिन्यात देखील कंपन्यांनी 14.50 रुपयांची कपात केली होती. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात घसरण किंवा वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायावर होतो.
हवाई वाहतूक क्षेत्राला दिलासा
विमानांना हवाई उड्डाणासाठी लागणाऱ्या एविएशन टर्बाइन फ्यूलच्या दरात देखील घसरण झाली आहे. हे दर 4.4 टक्क्यांनी म्हणजेच 2954.38 प्रति किलोलीटरनं कमी झाले आहेत. आता एटीएफची नवी किंमत 85486.80 रुपये प्रति किलोलीटर इतके आहेत. एअर इंडिया आणि इंडिगो या सारख्या कंपन्यांना हा दिलासा आहे. कारण, विमान वाहतूक कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी 30 टक्के खर्च फ्यूलवर होतो.
सलग तिसऱ्यांदा एटीएफच्या दरात कपात करण्यात आली आहे. 1 एप्रिलला 5870 रुपयांची कपात करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला एटीएफचे दर वाढले होते. आता मात्र सलग तिसऱ्या महिन्यात दरात कपात करुन दर संतुलित करण्यात आले आहेत.
जागतिक क्रूड ऑईलच्या दरात घसरण झाल्याचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ब्रेंट क्रूडची किंमत 63 डॉलर प्रति बॅरलवर आहे. एप्रिल 2021 नंतर पहिल्यांदा या पातळीवर दर आले आहेत.
आयएएनसच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश सौदी अरेबियानं संकेत दिलेत की ते दरात कपात करणार नाहीत. कमी दरासांठी दीर्घकाळ वाट पाहण्यास ते तयार आहेत. OPEC ची ताकद देखील यामुळं कमी पडू शकते.
भारत 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर घसरले असल्यानं आयातीची रक्कम कमी होते. त्यामुळं करंट अकाऊंट डेफिसिट घटते, रुपया मजबूत होतो. तेलाच्या दरातील घसरणीमुळं पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या दरात घसरण होते.यामुळं महागई नियंत्रित होते.
सरकारनं अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त एक्साईज ड्यूटी लावली आहे. मात्र, त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसला नाही. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी त्याचा भार उचलण्याचा निर्णय घेतला.
























