Gold vs Bank FD नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्व सामान्य जनतेसमोर गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. काही वर्षांपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना बँकेतील एफडी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांशिवाय पर्याय नसायचा. मात्र काही वर्षात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. देशातील सामान्य गुंतवणूकदार सोने, चांदी, म्युच्युअल फंडस, स्टॉक्स, बाँडमध्ये पैसे गुंतवत आहेत. मात्र, शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु होती. त्यामुळं गुंतवणूकदार सतर्क झाले होते. गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली होती. आपण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित की बँकेतील मुदत ठेवीतील गुंतवणूक चांगली हे पाहणार आहोत.
सोने
सोने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. अस्थिरतेच्या काळात सोने हा सुरक्षित पर्याय म्हणून त्यात गुंतवणूक केली जाते.जगभरात भूराजनैतिक तणाव वाढतो तेव्हा सोन्याच्या मागणीत वाढ होते. त्यावेळी सोन्याचे दर वाढतात. सोने कधी फिक्स किंवा खात्रीशीर परतावा देत नाही. दीर्घकाळाचा विचार करता सोनं दीर्घकाळ फायदा देते. याशिवाय सोन्यानं नेहमी महागाईचा सामना केला आहे. चलनाचं मूल्य घटलं तेव्ह सोन्याचे मूल्य वाढतं. सोन्याचे दर वेगवेगळ्या वेळी जोरदार तेजी आणि घसरण पाहायला मिळते.
बँकेतील मुदत ठेव
बँकेतील मुदत ठेव हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जतो. बँकेतील मुदत ठेव म्हणून कमीत कमी 7 दिवसांपासून जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत गुंतवणूक करु शकता. मुदत ठेवीत निश्चित मुदतीनंतर निश्चित परतावा मिळतो. भारत सरकारकडून बँकेतील 5 लाखापर्यंतच्या ठेवीवर मोफत विमा संरक्षण दिलं जातं. जेव्हा एखादी बँक दिवाळखोरीत जाते तेव्हा 5 लाख रुपये परत मिळतात. बँकेत 50 लाख रुपये जमा असले तरी बँक दिवाळखोरीत निघाली तर 5 लाख रुपये मिळतात.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)