Gold silver Rates Today: अमेरिका- इराण- इस्रायल युद्धाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. जगभरात इंधन, LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा, वाढती महागाई , सोन्या-चांदीच्या दरात होणारे चढ उतार, शेअर बाजारात होणारे बदल यामुळे संपूर्ण जगात अस्थिरता दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत शांततेचे संकेत दिल्यानंतर आणि पुढील पाच दिवस युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर सोन्या चांदीच्या दारात मोठे बदल दिसून आले होते. मात्र ट्रम्प यांच्या या विधानावर इराणने प्रतिक्रिया देत या सगळ्या चर्चा एकतर्फी असल्याचं म्हटल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. (Iran Isreal USA War)
देशांतर्गत सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या असून 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी आज 1 लाख 37 हजार 730 रुपये द्यावे लागतील. तर चांदीचा किलोमागे दर 2 लाख 16 हजार 900 रुपयांवर पोहोचलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि इराणमधील नेत्यांच्या वक्तव्यावर आता सोने चांदीच्या दरात चढउतार अवलंबून असल्याचं दिसू लागले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरीमुळं सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या दरात यापूर्वीच घसरण पाहायला मिळाली होती. काल सोन्याचा दर 1 लाख 39 हजार 720 रुपयांवर होता. तर चांदीची किंमत दोन लाख 25 हजार 530 रुपयांवर होती. आज सोन्याचा दर एक लाख 37 हजार 730 रुपये आहे. तर चांदीचा दर दोन लाख 16 हजार 900 रुपये आहे.
सोन्याच्या दरात चढ उतार
सकाळी बाजारपेठ उघडताना सोन्याचे असलेले 1,35,000 वर असणारे दर हे साडेपाच हजार रुपयांनी वाढून ते 145000 वर जाऊन पोहोचले होते. तर चांदीचे दर देखील 10 हजार रुपयांनी वाढून ते 216000 वरून 226000 वर जाऊन पोहोचल्याने,सुवर्ण बाजारात पुन्हा तेजी येण्याचे संकेत मिळाले होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इराणने आपली प्रतिक्रिया देताना अमेरिकेसोबत आपली कोणतीही बातचीत झालेली नाही, सांगत डोनाल्ड ट्रॅप यांचे वक्तव्य खोडून काढल्याने,सोन्याच्या बाजारात पुन्हा घसरण होऊन आज बाजारपेठ उघडताच सोन्याचे दर पुन्हा अडीच हजार रुपयांनी खाली येऊन 137730 वर आले आहेत. तर चांदीच्या दरात देखील सहा हजार रुपयांची घसरण होऊन ते पुन्हा 216900 पर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील काळात आता डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील सकारात्मक चर्चा होऊन युद्ध विराम होण्याची चिन्हे दिसू लागली तरच सोने चांदीच्या बाजाराला पुन्हा तेजी येण्याचे शक्यता वर्तविली जात आहे.मात्र युद्ध सुरूच राहिले तर अजूनही सोने चांदी दरात घट होण्याचा अंदाज देखील वर्तविला जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा जो दावा केला होता, तो इराणने केवळ फेटाळलाच नाही, तर त्याला 'फेक न्यूज' ठरवलं आहे. इराणची अधिकृत वृत्तसंस्था 'आयआरआयबी'ने (IRIB) ट्रम्प यांच्या विधानाला 'सायकोलॉजिकल ऑपरेशन्स' म्हणजेच मानसिक युद्धनीती म्हटलंय.
