मुंबई : भारतीय देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा चढ-उतार पहायला मिळत आहे. इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज (08 जुलै) सकाळी मुंबई आणि पुण्यात सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,970 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,970 रुपये इतका आहे. चांदीच्या किंमतीने या आधीच सत्तर हजारी पार केली आहे. आज चांदीच्या किंमतीत 600 रुपयांची घट झाल्याचं पहायला मिळालं असून एक किलो चांदीसाठी आता 70 हजार रुपये मोजावे लागतील.
गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सोन्याच्या किंमतीत दोन दिवसांपासून बदल होत असल्याचं दिसून आलंय. सोन्याच्या किंमतीत मंगळवारी 120 रुपयांची तर बुधवारी 320 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.
चांदीच्या वाढत्या किंमतीला ब्रेक
गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीमध्ये मोठी चढ-उतार पहायला मिळाली आहे. 30 जून रोजी चांदीमध्ये 400 रुपयांची घट झाली होती. त्यानंतर 1 जुलैला 1100 रुपये, 3 जुलैला 700 रुपये, 5 जुलैला 1200 रुपयांनी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 6 जुलैला चांदीमध्ये 200 रुपयांची वाढ झाली तर काल त्यामध्ये 600 रुपयांची घट झाल्याची पहायला मिळालंय.
महत्वाच्या बातम्या :
- राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना शिवसैनिकांकडूनच हरताळ?
- राज्यातील कोविड मुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरु होणार!
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम, 1 वर्षांखालील बालकांना देणार पीसीव्ही लस