Gold-Silver Price Today: गेल्या काही महिन्यांपासून जागतिक घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात (Gold and Silver Rates) सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होते. मात्र, आता ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 3,500 रुपयांची, तर चांदीच्या दरात 7,000 रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
अमेरिका आणि चीन (USA and China) या दोन प्रमुख जागतिक महासत्तांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टॅरिफ वॉर (Tariff War) सुरू असल्याचे चित्र होते. मात्र, नुकत्याच दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या बैठकीत एक करार पार पडला. या कराराचे सकारात्मक परिणाम जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात दिसून येत आहेत. या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळेच जागतिक सुवर्ण बाजारात (Global Gold Market) सोन्या-चांदीच्या किमतीत ही मोठी पडझड झाली आहे.
Gold-Silver Price Today: दीड लाखांवर पोहोचलेले सोन्याचे दर आले खाली
मागील महिनाभरापासून वस्तू व सेवा कराशिवाय (GST) सोन्याचे दर 1.5 लाख रुपयांच्या वर पोहोचले होते. येणाऱ्या दिवसांत या दरात अजून मोठी वाढ होईल असा अंदाज विविध तज्ज्ञांकडून वर्तवला जात होता. मात्र, काल 1,51,500 रुपयांवर असलेले सोन्याचे दर आज थेट 1,48,000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दुसरीकडे, काल 2,32,000 रुपये प्रति किलो असणारी चांदी आज 2,25,000 रुपयांवर घसरली आहे.
दरम्यान, "जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन दरम्यान झालेल्या आर्थिक करारांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव निर्माण झाला असून, त्याचाच हा परिणाम आहे. अचानक झालेल्या या घसरणीमुळे स्थानिक बाजारात खरेदीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे," अशी प्रतिक्रिया सुवर्ण व्यावसायिक सागर भंगाळे यांनी दिलीय.
तर, "गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले होते. आता दर अचानक कमी झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, योग्य वेळ साधून खरेदी करण्यासाठी आम्ही बाजारात आलो आहोत," अशी प्रतिक्रिया ग्राहक सचिन चौधरी यांनी दिलीय.
Gold-Silver Price Today: ग्राहकांची खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी
कमी झालेल्या या दरांचा विचार करता सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लग्नसराई आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमी झालेल्या या दरांचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी सराफा बाजारात सोने-चांदी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा
