Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
Gold Silver Price : एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीचे दर स्थिरावल्याचं चित्र आहे. सोने दरानं उच्चांक गाढल्यानंतर नफा वसुलीमुळं सोने दरात घसरण झाली आहे.

मुंबई : सोने गुंतवणुकीचं सुरक्षित साधन मानलं जातं. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्यानं ज्यावेळी जगभरात राजकीय तणाव निर्माण होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारतात. भारतात सोन्याला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. धनत्रयोदशी, दसरा, अक्षय तृतीया या सणांना सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदा 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे, या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला एक तोळे सोन्याचा दर 96 हजारांवर होता. एका वर्षात अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळं सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. भारतीय बाजारात सोन्याचे दर उच्चांक गाठल्यानंतर जवळपास 25000 हजारांनी कमी झाले आहेत.
गेल्या काही महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण पाहायला मिळाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या रिपोर्टनुसार 19 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 175340 रुपयांवर होता. तर, चांदीच्या दरानं 379988 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
सोमवारी 13 एप्रिलला 24 कॅरेट सोन्याचा दर 150011 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या दरात 25329 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीचे दर देखील सोमवारी 236981 रुपये किलोवर आहेत. चांदीच्या दरात 143007 रुपयांची घसरण झाली आहे.
सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 150011 रुपये होता, तर 23 कॅरेट सोन्याचा दर 149410 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 137410 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 112508 रुपये झाला आहे. 14 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 87756 रुपये आहे.
एप्रिल महिन्यात दर स्थिरावले
सोन्याचा 1 एप्रिलचा दर 150583 रुपये तोळा होता. सोमवारी म्हणजेच 13 एप्रिलला दर 150011 रुपयांवर होता. म्हणजेच सोन्याच्या दरात फारसे बदल झाले नाहीत. इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेी पहिली फेरी अयशस्वी ठरली आहे. यामुळं तेलाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षावर तोडगा निघाला नाही तर सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.
सोन्याच्या दरातील घसरणीचं एक कारण म्हणजे गुंतवणूकदारांनी डॉलरला पसंती दिली आहे. डॉलर सातत्यानं मजबूत होत आहे. ज्यामुळं गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.
दरम्यान, जळगावच्या सुवर्णा नगरीमध्ये आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 500 आणि चांदीच्या दरात 11 हजारांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदीचा एक किलोचा दर 2 लाख 59 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















