मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये आक्रमक धोरण राबवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष होताच कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली. त्यानंतर जगभरातील विविध देशांवर रेसिप्रोकल टॅक्स लादलण्याचा घोषणा करत ट्रम्प यांनी ते जाहीर केले. यानंतर त्याची अंमलबजावणी 90 दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली.  ट्रम्प यांच्या या आक्रमक राजकारणाचे परिणाम शेअर बाजार आणि सोन्याच्या दरावर दिसून आले. जगभरातील शेअर बाजार गडगडले, तर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचे दर एक लाखांच्या जवळपास आहेत.  अक्षय्य तृतीयेअगोदर सोन्याचे दर 1 लाखांपर्यंत जाऊन आले आहेत. येत्या काळात देखील सोन्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

जेपी मॉर्गन बँकेच्या अंदाजानुसार 2026 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 4000 डॉलर प्रति औंसवर जाऊ शकतात. दुसरीकडे मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार यार्डेनी रिसर्चचे अध्यक्ष एड यार्डेनी यांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 4000 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचतील तर 2026 पर्यंत सोन्याचा दर 5000 डॉलर प्रति औंस होऊ शकतो. या अंदाजानुसार सोन्याचे दर या वर्षीच 135000 रुपयांचा टप्पा ओलांडतील. तर, 2026 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 153000 रुपये असू शकतो. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार 2025 च्या अखेरपर्यंत सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3700 डॉलर प्रति ओंस असू शकतात. तर, पुढील वर्षी सोन्याचे दर 4500 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतात.जेपी  मॉर्गनच्या अंदाजानुसार गुंतवणूकदारांसह केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होण्याचा अंदाज आहे. 

जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार या वर्षी प्रत्येक तिमाहीत शुद्ध सोन्याची मागणी 710 टनच्या दरम्यान असू शकते. जेपी मॉर्गनच्या मतानुसार जर केंद्रीय बँकांकडून सोन्याची मागणी घटली आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरली तर सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते. 

चांदीच्या दराबाबत जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार 2025 मध्ये दुसऱ्या  सहामाहीमध्ये चांदीच्या दरात सुधारणा झालेली दिसून येईल.जागतिक बाजारात डिसेंबर पर्यंत चांदी 39 डॉलर प्रति औंस असेल. 

दरम्यान, जागतिक बाजारात अस्थिरता वाढल्यानं गुंतवणूकदारांकडून सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. शेअर बाजारात अस्थिरता वाढल्यानं गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी करत आहेत.  शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा गुंतवणूकादारांनी सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात साधारणपणे 15 ते 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे. एमसीक्सवर सोन्याचे दर 95000 ते 96000 हजारांच्या दरम्यान आहेत.