Gold Price Outlook मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाली. तर, चांदीच्या दरात देखील घसरण मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पाहायला मिळाली. 27 ऑक्टोबरला 5 डिसेंबरच्या वायद्याच्या चांदीच्या सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये 4560 रुपयांची म्हणजेच  3 टक्क्यांची घसरण झली. चांदीचा दर 142910 रुपयांवर आला जो 1400 रुपयांनी घसरला आहे. येत्या काळात सोन्याचे दर कमी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.  

Continues below advertisement

सोन्याच्या दरात आणखी घसरण?

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये कमोडिटी रिसर्चचे सीनिअर अनालिस्ट मानव मोदी यांच्या मते येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर जोरदार वाढत होते. गेल्या आठवड्यात पाच वर्षातील एका आठवड्यातील सर्वात मोठी साप्ताहिक वाढ सोने दरात झाली होती. त्यानंतर सोने दर घसरले आहेत. सोन्यातील गुंतवणूकदारांना यंदा चांगला फायदा झाला आहे. चांदीच्या दरात देखील उच्चाकांवर पोहोचल्यानंतर घसरण पाहायला मिळत आहे.  

सोन्याचे दर का घसरले?

जागतिक पातळीवर विचार केला असता रशिया आणि यूक्रेन आणि इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता वाढल्यानं त्याचा परिणाम झाला आहे. याशिवाय अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करार होण्याची शक्यता वाढल्यानं गुंतवणूकदारांची अस्वस्थता कमी झाली आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी मलेशियात ASEAN संमेलनात म्हटलं की आम्ही चीन सोबत एक चांगला करार करत आहोत. ते या आठवड्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. यामुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव कमी होताना दिसत आहे.   

Continues below advertisement

दुसरीके कॉमेक्सवर सोन्याचे दर 4400 डॉलर प्रति औंसवर पोहोचल्यानंतर आणि चांदीच्या दरात 85 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांकडून नफा वसूल केला जात आहे. बिझनेस टुडे सोबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलचे कमोडिटी रिसर्चर नवनीत दमानी यांनी आता किंमती 5-6 टक्के घसरतील असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच सोनं 6000 ते 7000 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं.