Gold Rate Today: अमेरिका अन् चीनमधील वाद वाढला, चांदीच्या दरात वाढ, सोने दरात तेजी की घसरण?
Gold Rate Today: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या टॅरिफ वॉरचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाल्याचं पाहायला मिळालं.

Gold Rate Today मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला विविध देशांवर रेसिप्रोकल टॅक्स लादण्याची घोषणा केली आहे. 9 एप्रिलपासून अमेरिेकेनं लादलेल्या टॅरिफची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. भारतावर अमेरिकेनं 26 टक्के परस्परशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प टॅरिफच्या वादळामुळं जगभरातील विविध देशांमधील शेअर बाजार कोसळले होते. त्याचवेळी सोन्याच्या दरावर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाली होती.आज सर्राफा बाजारात चांदीचे दर वाढले तर सोन्याच्या दरात 1050 रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
सोन्याचे दर घसरले अन् चांदीचे दर वाढले
देशाची राजधानी नवी दिल्लीमधील सर्राफा बाजारत सोन्याचे दर घसरल्याचं पाहायला मिळालं. एका दिवसात सोन्याचे दर 1050 रुपयांनी घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 1050 रुपयांनी कमी होऊन 90200 रुपयांवर आले. काल 10 ग्रॅम सोन्याचे दर 91250 रुपयांवर बंद झाले होते. 99.5 टक्के शुद्ध असणाऱ्या सोन्याचे दर 89750 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले. भारतात सोन्याचे दर घटले असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारत सोन्याचे दर वाढले आहेत.
अखिल भारतीय सर्राफा संघाकडून सोन्याच्या दरातील घसरणीचं कारण मागणी घडणं हे सांगण्यात येत आहे. मागणी कमी झाल्यानं सोने दरावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून ते 93200 रुपयांवर पोहोचले आहेत. मंगळवारी चांदीचे दर 92700 रुपयांवर होते. जागतिक पातळीवर सोन्याचे दर वाढले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारत सोन्याचे दर 61.98 डॉलर्सनं वाढून 3044.14 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळं सोने हा सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार पुन्हा सोन्यात गुंतवणूक सुरु करत आहेत. चीननं अमेरिकेवर 34 शुल्क लादलं होतं ते वाढवून 84 टक्के केलं आहे. चीननं लादलेल्या टॅरिफची अंमलबजावणी 10 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळं अमेरिकेचा डॉलर कमजोर झाला आहे. ज्यामुळं सोन्याचे दर वाढले आहेत. असं, एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले. आशियाई बाजारात चांदीच्या दरात देखील वाढ झाली. चांदीचे दर 2 टक्क्यांनी वाढून 30.41 डॉलर प्रति औंस झाले आहेत.
दरम्यान, भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. अमेरिकेनं सुरु केलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे.

























