Gold Price Today मुंबई : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धाच्या भडक्यामुळं गेल्या आठवड्यात शेअर बाजाराला धक्के बसले होते. आज, शेअर बाजार सावरल्याचं चित्र पाहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे युद्धामुळं निर्माण झालेल्या स्थितीत गुंतणूकदारांकडून गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जात आहे. याचाच परिणाम सोन्याच्या दरांवर दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं इतिहास रचला. ऑगस्टच्या वायद्याच्या सोन्यानं 101078 रुपयांपर्यंत मजल मारली होती. मात्र, थोड्या वेळानंतर एमसीएक्सवर सोन्याचे दर 1000290 रुपयांवर स्थिर झाले.
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळं पश्चिम आशियात व्यापक युद्धाचं संकट निर्माण झालं आहे. अमेरिकेनं हस्तक्षेपासंदर्भात इशारा दिला आहे. तर इस्त्रायलनं आणीबाणी लागू केली आहे. यामुळं जगभरातील गुंतवणूकदारांना या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर होईल, अशी भीती आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्यायांचा शोध घेतला जात आहे. काही गुंतवणूकदारांकडून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं गेल्यानं सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत.
भारत आणि पाकिस्तान संघर्षावेळी आणि रशिया-यूक्रेन युद्धावेळी देखील सोन्याचे दर वाढले होते. अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ वॉरचा वाद भडकला होता. त्यावेळी देखील सोन्याचे दर वाढले होते.
अमेरिकन डॉलर मजबूत झाला असून 18 जूनला होणाऱ्या अमेरिकन फेडलरल रिझर्व्ह च्या धोरण बैठकीमुळं गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. अमेरिकेमधील महागाईचे आकडे सकारात्मक असले तर इराण-अमेरिका यांच्यातील अणू चर्चा फिस्कटल्यानं देखील सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळतंय. सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता आहे.
COMEX वर सोन्याचा दर 3476 डॉलरवर स्थिर राहू शकतो, असं मानलं जातंय. सध्याचा वेग कायम राहिला तर सोन्याचा दर 3540 डॉलरवर पोहोचू शकतो. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दराला 98900 रुपयांचा सपोर्ट मिळतोय. तर, सोन्याचे दर पुन्हा एकदा 102000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.