नवी दिल्ली : इस्त्रायलनं इराणची राजधानी तेहरानवर हल्ले केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर गेले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पहिल्यांदा सोन्याच्या दरानं एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. सोन्यातील गुंतवणूकदारांना यंदा शेअर मार्केट पेक्षा चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळं हे निश्चित झालंय सोन्यातील गुंतवणूक संकटाच्या काळात उपयोगी पडणारी आहे. चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. चांदी देखील 1 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचली आहे.
सोने आणि चांदीच्या दरात वाढ का झाली?
इस्त्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं भू राजकीय तणाव वाढला आहे. ज्यामुळं गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यातील गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे. क्रूड ऑईलच्या दरात 13 टक्क्यांची तेजी आली आहे. यामुळं जगभरात पुन्हा आर्थिक संकट वाढलं आहे. डॉलर इंडेक्समध्ये देखील कमजोरी पाहायला मिळाली. वाढत्या तणावाच्या काळात जगातील विविध देशांकडून सोन्याचा साठा करण्यावर भर दिला जातो. सध्या चीन आणि भारताकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 ऑगस्टच्या वायद्याच्या सोन्याचे दर 1742 रुपयांनी वाढून 100154 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरात 533 रुपयांची वाढ झाली असून चांदी 1 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचली आहे.
सर्राफा बाजारात सोन्याच्या दरात देखील वाढ पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 97640 रुपयांवर पोहोचले आहेत. 23 कॅरेट सोन्याचे दर 97070 रुपयांवर आहेत. 22 ग्रॅम सोन्याचे दर 89270 रुपयांवर आहेत. 18 कॅरेट सोन्याचा दर 73090 रुपयांवर आहे. चांदीचे दर सध्या 1 लाख 6 हजार रुपयांवर आहेत.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या कडून जारी करण्यात आलेल्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याची विक्री 99170 रुपयांना केलीजात आहे. काल सोन्याचा दर 97164 रुपये इतका होता. आज सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर गेल्या 74 दिवसांमध्ये 10 हजार रुपयांनी वाढले आहेत. यापूर्वी सोन्याच्या दरात अशी वाढ पाहायला मिळाली नव्हती.
दरम्यान, जाणकारांच्या मते जगभरात सुरु असलेली युद्धजन्य परिस्थिती, तणावाची स्थिती न मिटल्यास गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून लोक सोन्याकडे वळत आहेत. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित पर्याय मानला जात असल्यानं आर्थिक, राजकीय तणावाच्या काळात गुंतवणुकदार सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. याशिवाय भारतात लग्नसराईच्या निमित्तानं सोने खरेदी होत असते.