मुंबई: लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ दिसून येत आहे. आज (मंगळवारी) दिल्लीच्या किरकोळ बाजारात सोन्याचे दर पहिल्यांदाच प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांवर पोहोचली. काल (सोमवारी) त्याची किंमत 96670 रुपये होती. म्हणजेच आज 24 कॅरेट सोने एका दिवसात प्रति 10 ग्रॅम 3330 रुपयांनी महाग झाले आहेत. त्याच वेळी, आज चांदीचा दर प्रति किलो 95,900 रुपयांवर पोहोचला. दरम्यान, सुरक्षित गुंतवणूक मागणीमुळे मंगळवारी सलग चौथ्या सत्रात सोन्याच्या वायद्यांच्या किमतीत वाढ झाली आणि ते 1,899 रुपयांनी वाढून 99,178 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. शिवाय, ऑक्टोबरमधील कराराने एमसीएक्सवर पहिल्यांदाच 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, 2000 रुपयांनी किंवा दोन टक्क्यांनी वाढून 1,00,484 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
जळगावात किती दर?
सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून सोन्याच्या दरात रात्रीतून पुन्हा 1500 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 99000 रुपये झाले आहेत. तर जीएसटीसह हेच सोन्याचे दर 102000 रुपये इतके झाले आहेत. आज अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि चायना मधील ट्रेड वॉर सोन्याच्या किंमती वाढीस कारणीभूत असल्याचं मानले जात आहे. दरम्यान काहीच दिवसांवर अक्षय तृतीया असल्याने देखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर लग्नसराई असल्याने सोने महाग झाले तरी खरेदी करताना दिसत आहेत.
सोन्याचे दर वाढण्याची कारणे
= जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याच्या किमतीत ही वाढ झाली आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यांच्यात व्याजदर कपातीवरून पुन्हा निर्माण झालेला तणाव आणि अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाची तीव्रत त्याचबरोबर सध्या अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपानसारख्या मोठ्या देशांची अर्थव्यवस्था मंदावत आहे. यामुळे जगात मंदीची भीती निर्माण होऊ शकते.
= डॉलर निर्देशांकाने अनेक वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. डॉलर कमकुवत झाल्यावर सोन्याची किंमत अनेकदा वाढते. कारण सोन्याची किंमत डॉलरमध्ये असते, ज्यामुळे मजबूत परकीय चलन धारकांसाठी ते स्वस्त होते. मंगळवारी कॉमेक्स सोन्याचा भाव प्रति ट्रॉय औंस $3,395 च्या जवळ होता.
= सोन्याच्या किमती वाढण्यामागील एक कारण म्हणजे मध्यवर्ती बँकांनी केलेली खरेदी. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी तयारी करत असताना जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या तीन वर्षांत 1000 टनांपेक्षा जास्त सोने खरेदी केले आहे. टाटा एएमसीच्या अहवालानुसार, सोन्याची मागणी प्रामुख्याने चीन, भारत आणि तुर्कीसारख्या बाजारपेठांमधून आहे, ज्यांचे साठे अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या इतर प्रमुख विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा कमी आहेत.अहवालानुसार, 2025 मध्ये मध्यवर्ती बँकेकडून दरमहा सरासरी 100 टन सोने खरेदी अपेक्षित आहे. वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या सोन्याच्या खरेदीत वाढ केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
= सोन्याच्या किमती वाढतात म्हणून सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. मंदीची वाढती भीती, मंदावलेली वाढ आणि सततच्या व्यापार युद्धाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गोष्टी शोधत आहेत.
= एका अहवालानुसार, गुंतवणूकदारांमध्ये गोल्ड ईटीएफ लोकप्रिय होत आहेत. यूबीएसच्या अंदाजानुसार, संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदार पर्यायी आणि अधिक स्थिर मालमत्ता शोधत असल्याने 2025 मध्ये गुंतवणूक 450 मेट्रिक टनपर्यंत पोहोचेल.
आता सोने खरेदी करावे का?
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या किमती अस्थिर राहू शकतात. परंतु अल्पावधीत त्या स्थिर राहतील. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर बहुतेक विश्लेषक या पातळ्यांवर शॉर्ट सेलिंग टाळण्याची शिफारस करतात. 2025 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 26% किंवा 20,800 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जरी भाववाढ मोठ्या प्रमाणावर होत असले तरी, विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला आता गुंतवणूक करायची असेल तर ती लहान टप्प्यात किंवा डिप्सवर करण्याचा विचार करा. येत्या काळात सोन्याच्या किमतीतही घसरण दिसून येईल, असे विश्लेषकांचे मत आहे. जर आर्थिक अनिश्चितता म्हणजेच व्यापार युद्ध आणि भू-राजकीय तणाव यांच्याशी संबंधित समस्या सोडवल्या गेल्या तर सोन्याच्या किमतीत अचानक घसरण दिसून येऊ शकते. या परिस्थितीत, सोन्याची किंमत प्रति औंस $2850 ते $2700 पर्यंत खाली येऊ शकते.