Gold Price News : सध्या सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्यानं वाढ होत आहे. वाढत्या दराचा मोठा फटका खरेदीदारांना बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या दरात 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 459 रुपयांनी वाढून 85,146 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचीही तीच अवस्था आहे. चांदी 46 रुपयांनी वाढून 95,632 रुपये किलो झाली आहे. सोन्याच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या अडचणीही वाढल्या आहेत. सोन्याच्या वाढत्या दरामुळं लग्नसराईचा हंगाम सुरु असतानाही सोन्याच्या मागणीत 80 टक्क्यांची घट झाली आहे.
सोन्याच्या दरात वाढ झाल्यानं दागिन्यांची मागणी 80 टक्क्यांनी घटली
सोन्याच्या सततच्या वाढत्या किमतींमुळं लोकांचा सोनं खरेदीचा कल कमी झाला आहे. लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर दागिन्यांची मागणी 80 टक्क्यांनी कमी झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, देशभरातील दागिने विक्रेत्यांच्या विक्रीत घट झाली आहे. लग्नसराईमुळे दरात वाढ झाली असली तरी ग्राहकांनी खरेदी मंदावली आहे. दुसरीकडे, चीनमधील डीलर्सनी खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी सूट देऊ केली आहे. एका महिन्यात सोन्याच्या दरात 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करणं परवडत नाही
ज्वेलर्सच्या म्हणण्यानुसार, अनेक ग्राहकांना लग्नाच्या हंगामासाठी सोने खरेदी करायचे आहे. परंतू वाढत्या किंमतीमुळे ते खरेदी करणे टाळत आहेत. अनेकदा लोक त्यांना फोन करुन विचारत आहेत की, सोन्याचे दर कधी कमी होतील? सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? कारण वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करणं परवडत नसल्याचं चित्र दिसत आहे.
भारतात दागिन्यांचा वापर वाढला
जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये भारताचा दागिन्यांचा वापर 563.4 मेट्रिक टन होता, जो चीनच्या 511.4 टनांपेक्षा जास्त होता. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेल्या भारतात सोन्याच्या दराने या आठवड्यात 88,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची विक्रमी पातळी गाठली आहे. 2024 मध्ये 21 टक्क्यांच्या वाढीनंतर या वर्षी केवळ 45 दिवसांत सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, नफा बुकिंगमुळे सोन्याच्या किमती 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या दबावामुळे जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीने प्रेरित होते.
महत्वाच्या बातम्या:
