सोमवारी जीएसटी सोडून सोन्याचा 10 ग्रामसाठी दर 48 हजार 886 रुपये इतका होता. यामध्ये आज जवळपास 1400 रुपयांची वाढ होऊन तो 50 हजार 282 रुपये इतका झालेला आहे. एकंदरीत विचार केला तर आज सोन्याच्या दरात 10 ग्रामसाठी 1400 रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी चांदी देखील 50 हजारांच्या पूढे गेली आहे. आणि आज दुसऱ्याचं दिवशी सोने देखील 50 हजारांच्या पुढे गेले आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणामुळे जगभरात मंदीचे सावट आहे. अशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीने आठ वर्षांच्या विक्रमी पातळीच्या आसपास जाण्याची किमया केली आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे या पिवळ्या धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या असुरक्षित वातावरणात ही सुरक्षित गुंतवणूक असल्याने लोकांचा सोन्याकडे कल दिसत आहे.
याबाबत बोलताना मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन म्हणाले की ही वाढ होणं अपेक्षित होतं. यामध्ये दसऱ्यापर्यंत आणखी वाढ होईल त्यावेळी सोन्याचे दर प्रतितोळा 55 ते 56 हजारांच्या आसपास असू शकतील. सध्या सोन्याचा अंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता सोनं 1700 ते 1800 डॉलरला पार करून पूढे गेले आहे. लॉकडाऊनच्या आधी सोनं 1250 च्या आसपास होतं. परंतू आता लॉकडाऊनचा परिणाम सोन्यावर जाणवू लागला आहे. भारतीय बाजाराचा विचार करता सोनं 38 हजार ते 40 हजाराच्या आसपास होते. परंतु आजअखेर त्यात 10 हजार रुपयांपर्यंत वध झाली आहे.
ही वाढ होण्यामागे सध्या देशात आलेली कोरोना व्हायरसची महामारी प्रमुख कारण आहे. यामध्ये लाखों लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सोन्याच्या दरात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सध्या देशात सोन्याची आयात कमी प्रमाणात झाली आहे. यासोबतच़ जगभरात सोन्याच्या ज्या खाणी आहेत. तिथं कोरोना व्हायरसचा फटका बसल्यामुळे कामगार कमी आहे. या सर्व बाबींचा परिणाम सोन्याचे दर वाढण्यास कारणीभूत ठरले आहेत.