Gold & Silver Price : जळगावच्या स्थानिक बाजारपेठेत आज सोन्या-चांदीच्या दरात (Gold & Silver Price) मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. एकीकडे सोन्याच्या दरात (Gold Price) गेल्या 24 तासांत तब्बल 1,000 रुपयांची घसरण झाली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरात (Silver Price) मोठी उसळी नोंदवली गेली असून, एक किलो चांदीचा दर जीएसटीसह 1,42,000 रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याचे दर घटले
आज जळगावच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 113,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला असून, जीएसटीसह हा दर 1,17,000 रुपयांपर्यंत जातो. सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासात साधारण 1,000 रुपयांची घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीशी दिलासा देणारी ही घसरण मानली जात आहे.
चांदीच्या दरात विक्रमी वाढ
दुसरीकडे, चांदीच्या दराने मात्र नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या महिनाभरात चांदीच्या दरात सुमारे 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. मागील महिन्यात एक किलो चांदीचा दर 1.27 लाखांच्या आसपास होता, तो आता वाढून आज जळगावमध्ये 1.38 लाख रुपये, तर जीएसटीसह थेट 1.42 लाख रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
जागतिक मागणी वाढल्याने चांदी महागली
चांदीच्या दरवाढीमागे जागतिक पातळीवर वाढलेली औद्योगिक मागणी हे प्रमुख कारण मानले जात आहे. परिणामी, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला असून चांदीने विक्रमी पातळी गाठली आहे. सुवर्ण व्यापारातील जाणकारांच्या मते, येत्या काही आठवड्यांत सोन्याच्या व चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेत सुरु असलेली आर्थिक अनिश्चितता, डॉलरचा दर, क्रूड ऑइलचे भाव आणि व्याजदरांमध्ये होणारे बदल याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींवर होत असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आणि खरेदीदारांनी या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी
दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच साध्या चांदीच्या दागिन्यांवर पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत आयात निर्बंध लादले आहेत. मुक्त व्यापार करारांचा (FTA) गैरवापर रोखण्यासाठी आणि तयार दागिन्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात चांदीच्या आयातीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. "आयात धोरणात 31 मार्च 2026 पर्यंत तात्काळ प्रभावाने मुक्त ते प्रतिबंधित असे सुधारणा करण्यात आली आहे," असे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) एका अधिसूचनेत म्हटले आहे. निर्बंध श्रेणीतील वस्तूंना सरकारकडून परवाना आवश्यक आहे. एप्रिल-जून 2024-25 ते एप्रिल-जून 2025-26 या कालावधीत प्राधान्य शुल्क सवलतींमधून साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
आणखी वाचा