Gold-Silver Rate Crash नवी दिल्ली: भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या एका महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याचा दर 18160 रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे एक किलो चांदीचा दर 62770 रुपयांनी घसरला आहे. 19 ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 1.47 लाख रुपये होता. आता एक तोळे सोन्याचा दर 1.29 लाख रुपये आहे. दुसरीकडे चांदीचा दर 2 लाख 12 हजार रुपयांवरुन 1 लाख 50 हजार रुपयांवर आला आहे. कार्तिकी एकादशीनंतर लग्नसराई सुरु होणार आहे, त्यामुळं सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करावेत की आणखी थांबावं असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. 

Continues below advertisement

एका महिन्यात सोनं  18160 रुपयांनी स्वस्त

बुलियन मार्केटमध्ये 19 ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 1,47,570 रुपये प्रति तोळा म्हणजेच 10 ग्रॅम होता. 19 नोव्हेंबरला सोन्याचा दर 1,29,410 रुपयांवर आला आहे, म्हणजेच एक तोळे सोने18,160 रुपयांवर आला आहे. लग्न सराईचा हंगाम आता सुरु होत आहे. ज्यामुळं ज्यांना दागिने खरेदी करायचे आहेत त्यांना सोने दरातील घसरणीमुळं दिलासा मिळू शकतो. तर, सोने दरातील घसरणीमुळं सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे.  

चांदीचे दर 62,770 रुपयांनी घसरले

सोन्याच्या दरातील घसरणीप्रमाणं चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. 19 ऑक्टोबरला एक किलो चांदीचा दर  2,12,770 रुपयांवर होता. 19 नोव्हेंबरला चांदीचा एक किलोचा दर 1,50,000 रुपयांवर आला आहे. म्हणजेच एका महिन्यात चांदीचा दर 62,770 रुपयांनी घसरला आहे. जानेवारी 2026 महिन्यात एक किलो चांदीचा दर 4 लाखांवर होता.  छोट्या गुंतवणूकदारांना चांदीच्या दरात तेजीची अपेक्षा होती, मात्र चांदीच्या दरात घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

Continues below advertisement

सोने आणि चांदीच्या दरात घसरण कशामुळं?

अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानं इतर देशातील सोने खरेदीदारांसाठी महागलं आहे. यामुळं मागणी कमी होऊन दर कमी होत आहेत. अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याज दर वाढवण्याची शक्यता असल्यानं त्याचा दबाव सोने दरावर आहे. सोन्यातील गुंतवणुकीवर व्याज मिळत नाही, त्यामुळं इतरत्र व्याज वाढल्यास गुंतवणूकदार इतर पर्यांयाचा विचार करतात. अमेरिकेची आर्थिक स्थिती, डॉलरमधील तेजी आणि घसरण आणि व्याज दरांबाबत बाजाराच्या अपेक्षा याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम होतो. 

IBJA च्या अपडेटनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर  123584 रुपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 113203 रुपयांवर आहे. एक किलो चांदीचा दर 150650 रुपये आहे.

दरम्यान, आता लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. लग्न आणि इतर कारणांमुळं सोने खरेदी करायचे असल्यास सध्याच्या दरानं खरेदी करता येईल. मात्र, सोने आणि चांदीचे दर आणखी कमी होतील या आशेनं खरेदी करणं टाळू नये. जे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतात त्यांनी एकाच वेळी सर्व पैसे लावण्याऐवजी वेगवेगळ्या वेळी गुंतवणूक करणं फायदेशीर ठरु शकतं. त्यामुळं सोने दरातील तेजी आणि घसरणीच्या जोखमीतून वाचू शकता.