Price and offer Changes from 1st December: एक डिसेंबरपासून अनेक गोष्टींच्या किंमतींमध्ये बदल होणार आहे. काही गोष्टी महाग होणार असून काही गोष्टी स्वस्त होणार आहे. सध्या सुरू असलेल्या काही ऑफर संपुष्टात येणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या किंमतीत होणार बदल...
गॅस सिलिंडरचे दर
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला इंधन कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. या आढाव्यात एलपीजी सिलिंडरचे दर कमी करावे की त्यात वाढ करावी याबाबत निर्णय घेतला जातो. बैठकीनंतर प्रत्येक कंपनीकडून दर महिन्याच्या एक तारखेला व्यावसायिक आणि एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातात. काही वेळेस दर कायम ठेवले जातात. एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गृह कर्ज ऑफर
सण-उत्सवाच्या दरम्यान अनेक बँकांनी गृह कर्जासाठी वेगवेगळ्या ऑफर जाहीर केल्या होत्या. यामध्ये कमी व्याज दर आणि शून्य प्रोसेसिंग शुल्क आदी ऑफर आदींचा समावेश आहे. बहुतांशी बँकांच्या ऑफर्स 31 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहेत. मात्र, एलआयसी हाउसिंग फायनान्सची ऑफर 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. एलआयसीकडून 6.66 टक्के दरांवर गृहकर्ज दिले जात होते.
SBI क्रेडिट कार्ड
तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणे महाग होणार आहे. सध्या, SBI कार्ड वापरण्यासाठी फक्त व्याज भरावे लागते. परंतु 1 डिसेंबरपासून, SBI Cards & Payment Services Private Limited (SBICPSL) ने जाहीर केले आहे की EMI व्यवहारांसाठी, आता कार्डधारकांना 99 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल आणि त्यावर करही भरावा लागेल.
रिलायन्स जिओचा प्रीपेड मोबाईल रिचार्ज प्लान महागला आहे
भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने आधीच प्रीपेड मोबाइल दरात वाढ केली आहे. आता रिलायन्स जिओनेही प्रीपेड मोबाइल दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे जो १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. रिलायन्स जिओच्या प्रीपेड ग्राहकांना 8 ते 20 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील.
आगपेटीच्या किमतीत वाढ
14 वर्षांनंतर आगपेटीची किमती वाढणार आहेत. माचिसची किंमत सध्याच्या एक रुपयावरून दोन रुपयांपर्यंत वाढवली जाणार आहे. आता दोन रुपयांच्या माचिस बॉक्समध्ये ५० काड्या मिळणार आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीमुळे आगपेटीच्या दरात वाढ करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले.
PNB ग्राहकांना धक्का
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या बचत खातेधारकांना मोठा धक्का दिला आहे. वास्तविक, बचत खात्याच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. आता वार्षिक व्याजदर 2.90 टक्क्यांवरून 2.80 टक्क्यांवर आला आहे. १ डिसेंबरपासून नवे दर लागू होतील.