Ayodhya New Flights : राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशभरातून आणि जगभरातून मोठ्या संख्येने भाविक उत्तर प्रदेशातील अयोध्येला पोहोचत आहेत. भाविकांच्या आणि व्यावसायिकांच्या सेवेसाठी केंद्रीय नागरीक उड्डाण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2024 पासून आठ शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे करणार उद्घाटन
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उड्डाण सेवांचे उद्घाटन होणार आहे. स्पाइस जेट या कंपनीची विमाने नवीन मार्गावर उड्डाण करणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच एअर इंडिया एक्सप्रेसने अयोध्या ते बेंगळुरू आणि कोलकाता या नवीन मार्गांची घोषणा केली होती, त्यानुसार 17 जानेवारीपासून नवीन मार्ग सुरू करण्यात आले होते. या मार्गांवर विमान कंपनी थेट उड्डाणे चालवत आहे.
कोणत्या शहरांमधून सुरू होणार विमानसेवा
अयोध्येसाठी एक फेब्रुवारी 2024 पासून आठ नवीन उड्डाण मार्ग सुरू करण्याची तयारी आहे. दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, मुंबई आणि बेंगळुरू या शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबई ते अयोध्या या दरम्यान दररोज विमानसेवा असणार आहे. मुंबईहून सकाळी 8.20 वाजता अयोध्येसाठी विमान उड्डाण करेल ते सकाळी 10.40 वाजता पोहचेल. तर, अयोध्येहून मुंबईसाठी सकाळी 11.15 वाजता विमान उड्डाण करेल ते दुपारी 1.20 वाजता मुंबईत दाखल होईल.
'सर्वात भव्य पर्यटन केंद्र म्हणून अयोध्या होणार विकसित'
30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत नव्याने बांधलेल्या महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले होते. भविष्यात या धार्मिक नगरीत होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अयोध्येतील विमानतळाचे बांधकाम करण्यात आले आहे. हा विमानतळ 350 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला जगातील सर्वात भव्य तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जात असल्याचे अनेकदा सांगितले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर अयोध्या जगाच्या पर्यटन नकाशावर सर्वात विकसित आणि भव्य पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला होता.