Continues below advertisement

नवी दिल्ली : देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटीदरम्यान धावेल अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ही रेल्वे हावडा ते गुवाहाटी (कामाख्या) पर्यंत धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.17 किंवा 18 जानेवारीपासून ही स्लीपर वंदे भारत सुरू होईल. खिशाला परवडणाऱ्या दरात प्रवाशांना या रेल्वेने आरामदायक प्रवास करता येईल,असंही अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय.

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत स्लीपर ट्रेन

वंदे भारत स्लीपरची पूर्ण चाचणी आणि प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. ही ट्रेन गुवाहाटी आणि कोलकाता दरम्यान धावणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. ही प्रगती भारतीय रेल्वे, देश आणि रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 2026 हे वर्ष भारतीय रेल्वेसाठी मोठ्या सुधारणांचे वर्ष असेल, ज्यात प्रवासी-केंद्रित अनेक उपक्रम सुरू केले जाणार आहेत, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Continues below advertisement

अश्विनी वैष्णव पुढं म्हणाले की वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी नवीन सस्पेंशनसह संपूर्णपणे नवीन रचना असलेली बोगी विकसित करण्यात आली आहे. बोगीच्या रचनेत अनेक नवीन सुधारणा करण्यात आल्या असून तिच्या अंतर्गत रचनेत आणि पायऱ्यांमध्ये एर्गोनॉमिक डिझाइनचा समावेश आहे, तसेच सुरक्षितता आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्वत्र विशेष निकष अंमलात आणलेले आहेत. वंदे भारत शयनयान गाडी एक आरामदायी, सुरक्षित आणि उच्च दर्जाचा रात्रीच्या प्रवासाचा अनुभव प्रदान करेल.

किती प्रवासी प्रवास करणार?

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील, ज्यात 11 थ्री- टियर वातानुकूलित डबे, 4 टू- टियर वातानुकूलित डबे आणि 1 फर्स्ट-क्लास वातानुकूलित डबा यांचा समावेश असेल, आणि या गाडीची एकूण प्रवासी क्षमता सुमारे 823 असेल.

वंदे भारत शयनयान गाडीमधील प्रवाशांना प्रवासादरम्यान त्यांच्या प्रादेशिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. गुवाहाटीहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये अस्सल आसामी पदार्थ मिळतील, तर कोलकाताहून सुरू होणाऱ्या ट्रेनमध्ये पारंपरिक बंगाली पदार्थांची चव घेता येईल, ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये एक आनंददायक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भोजनाचा अनुभव मिळेल.

तिकीट दर किती असणार?

कोलकाता ते गुवाहाटी वंदे भारत स्लीपर ट्रेनचं 3 एसीचं तिकीट 2300 रुपये असेल. 2 एसीचं तिकीट 3000 रुपये आणि फर्स्ट एसीचं तिकीट 3600 रुपये असेल, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिलीय

वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये:

180 किमी प्रतितास पर्यंत डिझाइन गती असलेली अर्ध-उच्च-गती ट्रेन

सुधारित कुशनिंगसह एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले बर्थ

सहज हालचालीसाठी वेस्टिब्यूलसह स्वयंचलित दरवाजे

उत्कृष्ट सस्पेंशन आणि आवाज कमी करण्याच्या तंत्रज्ञानामुळे अधिक आरामदायी प्रवास

कवच (KAVACH) सह सुसज्ज

उच्च स्वच्छता राखण्यासाठी निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान

प्रगत नियंत्रणे आणि सुरक्षा प्रणाली असलेली चालक केबिन

वायुगतिकीय बाह्य स्वरूप आणि स्वयंचलित बाह्य प्रवासी दरवाजे

दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था

आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलट यांच्यात संवादासाठी आपत्कालीन टॉक-बॅक युनिट

सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

सुधारित अग्निसुरक्षा: इलेक्ट्रिकल कॅबिनेट आणि शौचालयांमध्ये एरोसोल-आधारित आग शोध आणि नियंत्रण प्रणाली