Farmer Success Story : अलिकडच्या काळात तरुण शेतकरी (Young Farmer) आपल्या शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी भरघोस, उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका युवकाची यशोगाथा (Success Story) पहणार आहोत. या युवकानं खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवलं आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेला तरुण शेतकरी कैलास पवारने (Kailash Pawar) स्ट्रॉबेरी (Strawberry) पिकातून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. जाणून घेऊयात त्याची यशोगाथा.
यूट्यूब वरुन स्ट्रॉबेरीच्या लागवडीसंदर्भात माहिती घेतली
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेला तरुण शेतकरी कैलास पवारने यूट्यूब वरून स्ट्रॉबेरीची लागवडीची माहिती घेतली होती. त्यानंतर कैलासने त्याच्या 6 एकर खडकाळ ओसाड जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आज या पिकातून कैलास वर्षाला 36 लाख रुपयांचा नफा कमावत आहे. या पिकवलेल्या स्ट्रॉबेरीची लागवड सध्या महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये केली जाते.
बटाटा-टोमॅटोमधून चांगले उत्पन्न मिळत नव्हते म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड
कैलास छिंदवाडा जिल्ह्यातील भुताई गावात त्याच्या 6 एकर नापीक खडकाळ जमिनीवर बटाटा-टोमॅटो पीक घेत होता. परंतू, त्याला चांगले उत्पादन मिळत नव्हते. त्यामुळे त्याने पीकचक्र सुधारण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी शेतीचे काही व्हिडिओ पाहिले आणि अधिक माहिती गोळा केली. नंतर बिचुआ येथील स्ट्रॉबेरीची शेती करणारे शेतकरी वेदांत पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडूनही माहिती घेतली.
उज्जैनहून आणली स्ट्रॉबेरीची रोपे
कैलासने दिलेल्या माहितीनुसार, विंटर डाउन जातीची स्ट्रॉबेरीची रोपे उज्जैनमधील एका गावातून 10 रुपये प्रति नग या दराने विकत घेतली. यानंतर त्याने नापीक खडकाळ जमीन स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य केली. यानंतर त्यांनी शेतात 3 फूट अंतरावर बेड तयार केले आणि सिंचनानंतर प्रत्येकी एक फूट अंतर ठेवून दीड इंच खोलीवर स्ट्रॉबेरीची रोपे लावली. अशा प्रकारे त्यांनी एकूण 22 हजार रोपांची लागवड केली. सप्टेंबरमध्ये त्यांनी या रोपांची लागवड केली होती, ज्यापासून दोन महिन्यांनीच उत्पादन सुरू होते.
एकरी 6 लाख रुपये नफा
स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी प्रति एकर सुमारे 5 लाख रुपये खर्च केले जातात, तर नफा दुप्पट म्हणजे सुमारे 6 लाख रुपये आहे. अशा प्रकारे त्यांना 6 एकर जमिनीतून वार्षिक 36 लाख रुपयांचा नफा मिळत आहे.
फक्त 60 दिवसात लागतात फळे
तण आणि पाण्याच्या बाष्पीभवनापासून आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी कैलासने मल्चिंग तंत्राचा वापर केला आहे. तो सिंचनासाठी ठिबक पद्धतीचा वापर करत आहे. लागवडीपासून 45 ते 50 दिवसांत फुले येण्यास सुरुवात होते. 60 दिवसांनी फळे दिसू लागतात. प्रत्येक झाडाला सुमारे अर्धा किलो फळे येतात. कैलासने आपल्या शेतात कुंपण आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळं कोणाची घुसखोरी आणि भटक्या प्राण्यांपासून पिकाला धोका होणार नाही.
