नवी दिल्ली :एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशननं बुधवारी ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी जाहीर केली आहे. ऑक्टोबरमध्ये 13.41 लाख नवे सदस्य इपीएफओशी जोडले गेले आहेत. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या मतानुसार इपीएफओनं राबवलेल्या उपक्रमांमुळं सदस्यांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे.
इपीएफओच्या ऑक्टोबरच्या पेरोल डेटानुसार ऑक्टोबर महिन्यात नव्यानं 7.50 लाख सदस्यांची नोंदणी झाली. यामध्ये 18 ते 25 वयोगटातील सदस्यांचं प्रमाण 58.49 टक्के आहे. या वयोगटातील सदस्यसंख्या 5.43 लाख इतकी आहे. या आकडेवारीनुसार तरुणांमध्ये संघटीत क्षेत्रात काम करण्याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे.
पेरोल डेटानुसार 12.90 लाख सदस्य यातून बाहेर पडले आणि पुन्हा ईपीएफओशी जोडले गेले. ऑक्टोबर 2023 च्या आकडेवारीच्या तुलनेत ऑक्टोबर 2024 मध्ये 16.23 टक्के वाढ झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात 2.09 लाख नव्या महिला सदस्य इपीएफओशी जोडले गेले. ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 2.12 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, एकूण 2.79 लाख महिला सदस्यांची वाढ झाली आहे. महिलांच्या संख्येत वाढ होणं हे देखील सकारात्मक चित्र दिसून येतं.
पेरोल डेटाच्या आकडेवारीनुसार प्रमुख पाच राज्य अन् केंद्रशासीत प्रदेशातील कर्मचाऱ्यांची टक्केवारी 61.32 टक्के इतकी आहे. या पाच राज्यांमधून 8.22 लाख सदस्य ईपीएफओमध्ये योगदान देत आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातून 22.18 टक्के सदस्यांची नोंदणी झाली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, नवी दिल्ली, हरियाणा, तेलंगाणा आणि गुजरात या राज्यांमधून 5 टक्क्यांपेक्षा अधिक सदस्यांची वाढ झाली आहे.रस्ते वाहतूक, इलेक्ट्रॉनिक मीडिया कंपनी, खासगी क्षेत्र अन् खासगी बँका या क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पेरोल डेटानुसार ईपीएफओ सदस्यांच्या संख्येत सर्वाधिक वाढ महाराष्ट्र राज्यातून झाली आहे.
पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रकिया सोपी होणार
केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार पीएफ खात्यातून रक्कम काढणं सोपं व्हावं म्हणून लवकरच पीएफ खातेदारांना स्मार्ट कार्ड दिली जाणार आहेत. स्मार्ट कार्डद्वारे एटीएम सेंटरवरुन पीएफ खात्यातील रक्कम काढता येऊ शकते. मात्र, ही रक्कम काढण्यावर 50 टक्क्यांची मर्यादा असेल. पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार असली तरी त्यासंदर्भातील नियम मात्र तेच राहणार असल्याची माहिती आहे. याशिवाय इपीएफओकडून पीएफ खातेदारांना चांगला परतावा देण्यासाठी इक्विटीमधील गुंतवणूक वाढवण्यावर देखील भर दिला जाणार आहे. 2015 मधील नियमानुसार इपीएफओकडून इक्विटीमध्ये 15 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येईल. सध्या 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केली जात आहे.
इतर बातम्या :