EPFO Pension : निवृत्तीनंतर पेन्शन (Pension) म्हणून मोठी रक्कम मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी सदस्य आणि नियोक्ते (Employer) संयुक्तपणे अर्ज करु शकतील. सुधारित योजनेची निवड न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चार महिन्यांची मुदत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली चार महिन्यांची मुदत संपण्यासाठी 15 दिवस शिल्लक असताना ईपीएफओने परिपत्रक काढून सूचना जारी केल्या आहेत.


सुप्रीम कोर्टाने नोव्‍हेंबर 2022 मध्‍ये कर्मचारी पेन्‍शन (सुधारणा) योजना 2014 वैध घोषित केली होती. त्यापूर्वी 22 ऑगस्ट 2022 रोजी EPS मध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये, पेन्शनपात्र पगाराची मर्यादा 6500 रुपये प्रति महिन्यावरुन 15,000 रुपये करण्यात आली होते. यामध्ये, जर पगार या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ते ईपीएसमध्ये वास्तविक पगाराच्या 8.33 टक्के योगदान देण्याचीही परवानगी दिली होती.


3 मार्च 2023 ची डेडलाईन


सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार पात्र कर्मचारी निकालाच्या तारखेच्या चार महिन्यांच्या आत ईपीएसद्वारे वाढीव पेंशनचा पर्याय निवडू शकतात. हा निकाल 4 नोव्हेंबर रोजी आला होता. या निकालाची चार महिन्यांची मर्यादा म्हणा अथवा डेडलाईन 3 मार्च 2023 रोजी संपत आहे.  


कशी असेल प्रक्रिया?


सुधारित योजनेची निवड न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची मुदत दिली होती. ईपीएफओने म्हटले आहे की, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे कर्मचारी आणि त्यांचे नियोक्ते उच्च पेन्शनसाठी संयुक्त पर्याय निवडू शकतात. यासाठी, 1 सप्टेंबर 2014 किंवा त्यापूर्वी EPFO ​​चे सदस्य बनलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक ऑनलाईन सुविधा सुरु केली जाईल. संबंधित यूआरएलमध्ये आवश्यक बदल लवकरच केले जातील. हे झाल्यानंतर, प्रादेशिक पीएफ आयुक्त सूचना फलक आणि बॅनरद्वारे विस्तृत माहिती देतील. अर्ज नोंदवून डिजिटली नोंद (लॉग) केल्यानंतर अर्जदाराला पावती क्रमांक दिला जाईल. यासंबंधीचे निर्णय संबंधित विभागीय अधिकाऱ्याकडून घेतले जातील आणि अर्जदाराला ई-मेल आणि एसएमएसद्वारे त्याची माहिती दिली जाईल.


जास्त पगाराच्या आधारे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ज करावा लागेल


तर ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच उच्च वेतनासाठी योगदान दिले आहे, पण औपचारिकता पूर्ण केलेली नाही त्यांना आता ईपीएफओ प्रादेशिक कार्यालयामध्ये अर्ज करावा लागेल.भविष्य निर्वाह निधीपासून पेन्शन फंडात पैसे वाटप किंवा निधी पुन्हा जमा करण्यासंबंधी कोणतेही काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना संयुक्त पर्याय फॉर्ममध्ये विशिष्ट माहिती द्यावी लागेल.


वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया



  • जास्त पेन्शन मिळविण्यासाठी, EPS सदस्याला जवळच्या EPFO ​​कार्यालयात जावे लागते.

  • तेथे त्यांना अर्जासोबत मागितलेली कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

  • आयुक्तांनी दिलेल्या पद्धतीनुसार आणि स्वरुपानुसार अर्ज द्यावा लागणार आहे.

  • संयुक्त पर्यायामध्ये डिस्क्लेमर आणि डिक्लेरेशन देखील असेल.

  • भविष्य निर्वाह निधीमधून निवृत्ती वेतन निधीमध्ये अॅडजस्टमेंट करण्याची आवश्यकता असल्यास, संयुक्त अर्जात कर्मचार्‍यांची संमती आवश्यक असेल.

  • एक्झम्प्टेड प्रॉव्हिडंट फंड ट्रस्टकडून पेन्शन फंडात निधी हस्तांतरित करण्याच्या बाबतीत, ट्रस्टीला हमीपत्र सादर करावे लागेल.

  • अर्ज सबमिट केल्यानंतर लवकरच URL (युनिक रिसोर्स लोकेशन) सूचित केले जाईल.