नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं त्यांच्या सदस्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यूनिवर्सल अकाऊंट नंबर सक्रिय करण्यासाठी उमंग मोबाईल एपचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याची सुरुवात 7 ऑगस्ट पासून होणार आहे. ईपीएफओनं स्पष्ट केलं आहे की आधार फेस ऑथेंटिकनेशन द्वारे उमंग एपमधूनचं यूएएन सक्रिय केला जाईल, असं न करणाऱ्यांचा सेवा देखील बंद केल्या जाऊ शकतात. 

ईपीएफओनं त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. 30 जुलै जाहीर केलेल्या एका परिपत्रकाद्वारे याबाबत माहितीदेण्यात आली आहे. आता सदस्यांना आधार बेस्ड फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांचा यूएएन क्रमांक जनरेट करावा लागेल. मात्र, आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात फक्त एम्प्लॉयर द्वारे यूएएन क्रमांक जनरेट करण्याची जुनी पद्धत सुरु राहील. इतर सर्व यूएएन जनरेट करण्याची प्रक्रिया आधार फेस ऑथेंटिकेशन पद्धतीद्वारे केली जाईल. याची सर्व प्रक्रिया उमंग एपमधून होईल. यासाठी एम्प्लॉयरची आवश्यकता नसेल. 

ईपीएफओच्या नव्या नियमानुसार कर्मचारी आता स्वत: यूएएन क्रमांक जनरेट आणि सक्रीय करण्यासाठी उमंग एपचा वापर करता येईल. कर्मचाऱ्यांना आता प्ले स्टोअरवरुन उमंग APP  आणि आधार फेस आरडी APP डाऊनलोड करावं लागेल. हे सक्रीय झाल्यानंतर E-UAN कार्डची डिजीटल कॉपी डाऊनलोड करता येईल. त्यानंतर ते ईपीएफओशी जोडण्यासाठी एम्प्लॉयरला देता येईल.

नव्या तंत्रज्ञानानुसार यूएएन जनरेट करण्यासाठी यूजरकडे आधार कार्ड क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे. याशिवाय Aadhaar Face RD App चेहऱ्याचं स्कॅनिंग करण्यासाठी आवश्यक असेल. 

UAN क्रमांक कसा तयार करायचा?

सर्वप्रथम मोबाईल फोनमध्ये Umang App सुरु करा आणि त्यातील ईपीएफओ ऑप्शनला भेट द्या.

यानंतर  UAN allotment and activation चा पर्याय निवडा.

आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नोंदवा. त्यानंतर आधार पडताळणीच्या बॉक्सवर क्लिक करा . यानंतर ओटीपी पाठवा पर्यायावर क्लिक करुन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी Aadhaar Face ID App इन्स्टॉल करावं लागेल.

सिस्टीममध्ये उपलब्ध असलेला यूएएन क्रमांक मिळाला नाही तर नवा यूएएन क्रिएट करावा लागेल. पडताळणीनंतर यूएएन आणि अस्थायी पासवर्ड एसएमएसद्वारे पाठवला जाईल. ही सुविधा पहिल्यांदा यूएएन क्रमांक तयार करणाऱ्यांना आणि ज्यांनी अद्याप यूएएन क्रमांक सक्रीय केले नाहीत त्यांना वापरता येणार आहे.