नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत पीएफ खातेदारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. पीएफ खात्यात शिल्लक ठेवण्याची किमान रक्कम 25 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. हे उदाहरण अधिक सोपं करुन समजून घ्यायचं असेल तर एखाद्या खातेदाराच्या खात्यात 10 लाख रुपये शिल्लक असतील तर त्याला अडीच लाख रुपये खात्यात शिल्लक ठेवायला लागणार होते. आता नव्या निर्णयानुसार पीएफ खातेदार खात्यातून 9 लाख रुपये काढता येतील आणि खात्यात 1 लाख रुपये शिल्लक ठेवता येतील. 

Continues below advertisement

ईपीएफओच्या सीबीटीनं निवृत्तीनंतर एकाच वेळी पैसे काढण्याऐवजी  SWP म्हणजेच सिस्टीमेटिक विड्रॉल प्लान देखील मंजूर केला आहे.  यामुळं पीएफ खातेदारांच्या हातात जेव्हा गरज असेल तेव्हा पैसे मिळतील. इतर पैसे खात्यात राहतील आणि खातेदाराला व्याज मिळेल.

खात्यातील 90 टक्के रक्कम काढता येणार  

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सीबीटीच्या बैठकीतील निर्णयानुसार कर्मचारी आता त्यांच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढू शकतात. आता त्यांना गरजेच्या वेळी अधिक पैशांची तजवीज करताना अधिक विचार करावा लागणार नाही. गरजेच्यावेळी आवश्यकतेनुसार पैसे काढता येतील. अटी आणि नियमांसह गरजेच्यावेळी 90 टक्के रक्कम खात्यातून काढता येईल. तर, खात्यात 10 टक्के रक्कम राहील. 

Continues below advertisement

पेन्शन वाढीची चर्चा पण निर्णय नाहीच

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत ईपीएस पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या ईपीएस अंतर्गत मिळणारी पेन्शन 1000 रुपये आहे. पेन्शनमध्ये वाढ करुन ती 7500 रुपये करावी अशी पेन्शनधारकांची मागणी होती. मात्र, ती रक्कम 3000 रुपये केली जाऊ शकते, अशा देखील चर्चा होत्या. मात्र, या बैठकीत पेन्शनवर काही चर्चा झालेली नाही.  

दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 16 सप्टेंबरपासून ईपीएफओ वेतन मर्यादा 15 हजार रुपयांवरुन वाढवून 25 हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळं 50 लाखांहून अधिक कर्मचारी ईपीएफओच्या कक्षेत येतील. यामुळं अधिक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळेल.