Edible Oil Price Reduced : दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. दरम्यान आता सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या दरात कपात करण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या दरात सर्वसामान्यांसाठी ही मोठी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा स्वयंपाकघरातील खर्च काहीसा कमी होणार आहे. खाद्यतेल उत्पादकांनी पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत प्रति लिटर 15 रुपयांपर्यंत कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्यानंतर उत्पादकांकडून दरात कपात करण्यात आली आहे.


महागाई कमी होण्याची शक्यता
इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसणार आहे. ब्रँडेड खाद्यतेलाच्या किमती कमी होतील. मात्र, प्रिमियम खाद्यतेल ब्रँडच्या किमती कमी व्हायला काहीसा वेळ लागेल. खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे परिणामी खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम किरकोळ आणि घाऊक बाजारात होऊन महागाईत घट होण्याची अपेक्षा आहे. 


मदर डेअरीकडून दिल्लीमध्ये खाद्यतेलाच्या किमतीत 15 रुपयांची कपात
एक प्रमुख दूध पुरवठादार कंपनी असलेल्या मदर डेअरी कंपनीनं दिल्लीमधील  आपल्या खाद्यतेलाच्या किमती प्रति लीटर 15 रुपयांनी कमी केल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती घसरल्याचं मदर डेअरी कंपनीनं सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीनं दरात कपात करण्याचं पाऊल उचललं आहे. मदर कंपनीनं त्यांच्या  'धारा' या ब्रँडच्या खाद्यतेलाच्या किंमतीत कपात केली आहे. आता धारा कंपनीच्या एक लिटर मोहरीच्या तेलाची किंमत 208 रुपयांवरून 193 रुपये प्रति लीटर झाली आहे.


'धारा'च्या इतर तेलांच्या कमी झालेल्या किमती जाणून घ्या
धारा रिफाइंड सनफ्लॉवर ऑईल (एक लिटर) पूर्वीच्या 235 रुपयांऐवजी आता 220 रुपये प्रति लिटर असणार आहे. धारा रिफाइंड सोयाबीन तेलाची (1 लिटर) किंमत 209 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. मदर डेअरीने एका निवेदनात म्हटले आहे की, धारा खाद्यतेलांची किंमत (MRP) प्रति लिटर 15 रुपयांनी कमी केली जात आहे.