Hero MotoCorp Chairman Pawan Munjal : ऑटोमोबाईल कंपनी (Automobile Company) हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) चे चेअरमन पवन मुंजाल (Pawan Munjal) आता ईडीच्या रडारवर आहेत. पवन मुंजाल यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने छापेमारी केली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA-Ministry of Corporate Affairs) हिरो मोटोकॉर्प कंपनीविरोधात तपास सुरु केला आहे. हीरो मोटोकॉर्पच्या काही व्यवहारांमध्ये प्राप्तिकर विभागाने केलेल्या तपासाची दखल घेत आता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेही तपास सुरू केला आहे.


पवन मुंजाल यांच्या घरी ईडीची छापेमारी


पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल आणि इतर काही जणांवर छापे टाकले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्ली आणि शेजारील गुरुग्राम येथील परिसरात छापेमारी करण्यात येत आहे. ईडीच्या छापेमारीची बातमी समोर आल्यानंतर, हीरो मोटोकॉर्प कंपनीचे शेअर्स गडगडले.


हिरो मोटोकॉर्प कंपनीचे शेअर्स गडगडले


ईडीच्या छापेमारीनंतर हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या स्टॉकमध्ये घट झाली आहे. हीरो मोटोकॉर्प कंपनीचे शेअर्स दुपारी 1.30 वाजता सुमारे 4 टक्क्यांनी घसरले आणि 3,083 रुपयांवर व्यवहार करत होते. मंगळवारी दुपारी हिरो मोटोकॉर्प कंपनीचा शेअर 4.26 टक्क्यांनी किंवा 136.45 रुपयांनी घसरून 3067.10 रुपयांवर व्यवहार करत होता.


बनावट कंपन्या चालवल्याचा आरोप


कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कथित कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रकरणात हिरो मोटोकॉर्प कंपनीविरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, कथितपणे हिरो मोटोकॉर्पवर शेल कंपन्या चालवल्याचा आरोप आहे. 


याआधी आयकर विभागाचीही छापेमारी  


दरम्यान, याआधी 2022 मध्ये पवन मुंजाल यांच्या घरावर आयकर विभागानेही छापेमारी केली होती. आयकर विभागाने एअर चार्टर एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिरो कॉर्प ग्रुपवर छापे टाकले होते. यावेळी सुमारे 36 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. दिल्ली, नोएडा, गुडगाव, गाझियाबाद पंजाबमध्ये छापे टाकण्यात आले होते.


40 देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय


2001 मध्ये हिरो मोटोकॉर्प कंपनी एका वर्षात सर्वाधिक दुचाकी विक्री करणारी जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी बनली. कंपनीने सलग 20 वर्षे पहिलं स्थान कायम राखलं आहे. कंपनीचे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील 40 देशांमध्ये व्यवसाय आहे.